"मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेणार, पण ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही"
By कमलेश वानखेडे | Published: September 11, 2023 01:39 PM2023-09-11T13:39:51+5:302023-09-11T13:42:26+5:30
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन : दोन समाज आमोरा समोर येतील असा निर्णय घेणार नाही
नागपूर : ओबीसी समाजात भिती आहे की आमचे आरक्षण कमी होणार, पण सरकारचा असा कुठलाही हेतू नाही. ओबीसी समाजाने कुठलाही गैरसमज करुन घेऊ नये. आमच्या सरकारच्या वतीने आम्ही ओबीसी समाजाला आश्वस्त करतोय की काहीही झाले तरी सरकार ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपुरात आश्वस्त केले.
फडणवीस म्हणाले, राज्यात जेव्हा समाजाचे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा हे प्रश्न समाजाच्या पलीकडे असतात. त्यामुळे सगळ्यांनी मिळून समाजाच्या हिताचा निर्णय घ्यायचा असतो. दोन समाज आमोरा समोर येतील, असा कुठलाही निर्णय सरकार घेणार नाही. आजच्या मुंबईतील बैठकीत सर्वानुमते पुढे जाण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानिमित्ताने मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आहे. त्यांच्या मागण्या आहेत, तशा इतरही समाजाच्या मागण्या आहेत.
जरांगे पाटील यांच्याशी बोलून मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे शेवटी कायद्याचा विचार करावा लागतोय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करावा लागतोय. प्रश्न सोडवायचा असेच तर कायद्याच्या चौकटीत टिकलेही पाहिजे. अन्यथा समाज म्हणेल आमची फसवणुक केलीय. त्यामुळे सर्वांनी मिळून यावर काय मार्ग काढता येईल हा प्रयत्न केला जाईल. सगळ्यांनी मिळून सकारात्मक विचार केला तर समाजाचेही भले होईल, असेही ते म्हणाले.