कृषी विद्यापीठाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 08:56 PM2019-12-16T20:56:18+5:302019-12-16T20:56:36+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संपूर्ण देशात नावलौकिक आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यापीठाची जमीन आहे, मात्र जमिनीचा लिलाव होत असल्याची माहिती दुर्दैवी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संपूर्ण देशात नावलौकिक आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यापीठाची जमीन आहे, मात्र जमिनीचा लिलाव होत असल्याची माहिती दुर्दैवी आहे. या जमिनीचे रक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी संशोधनाचे कार्य अधिक विस्तारित व्हावे व विद्यापीठाचा विकास व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून आर्थिक तरतूद करण्यास सांगणार असल्याचा विश्वास विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
अॅग्रोव्हेट-अॅग्रोइंजिनीअर्स मित्र परिवाराच्या वतीने कृषी पदवीधारक आमदारांचा सत्कार समारंभ आज पंजाबराव देशमुख स्मृती स्मारक परिसराच्या आवारात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कृषी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री अनिल देशमुख, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, रजिस्ट्रार प्रकाश कडू, माजी कुलगुरू शरद निंबाळकर, दिलीप चौधरी, देवानंद पंचभाई, संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहितकर, सचिव प्रणय पराते, डॉ. सुनील सहतपुरे, मिलिंद राऊत आदी उपस्थित होते. यावेळी आमदार अशोक पवार, मनोहर चंद्रिकापुरे, श्यामसुंदर शिंदे, सुलभा खोडके, शेखर निकम, शिरीष चौधरी या कृषी पदवीधारक आमदारांचा सत्कार करण्यात आला.
नाना पटोले पुढे म्हणाले, नवीन पिढी शेतीपासून दूर जात आहे, हे वाईट चित्र आहे. त्यामुळे लौकिक असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला शेतकऱ्यांना नवीन संशोधनाचा, नवीन तंत्रज्ञानाचा फायदा मिळवून देण्यासोबतच, तरुण पिढीला शेतीकडे वळवण्याचे महत्त्वाचे काम करावं लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. संघटनतर्फे विद्यार्थी व शेतकऱ्यांकरिता खुले अध्ययन केंद्र उभारण्याकरिता आर्थिक साहाय्य करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कृषिमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले, सध्या शेती हा राज्यासमोरील गंभीर प्रश्न आहे. शेती आणि शेतकºयांच्या परिस्थितीत बदल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार केला पाहिजे. यासाठी हे सुशिक्षित शेतकरी आमदार राज्यातील शेतकºयांना मार्गदर्शन करण्याचा विडा उचलतील, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला निश्चित विकासाच्या मार्गावर पुढे नेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता मी न्यायाधीश आहे : पटोले
शेतीचे, बेरोजगाराचे प्रश्न उचलल्याने आता विधानसभा अध्यक्ष म्हणून संधी मिळाली. पण मी आता कोणत्या पार्टीचा नेता नाही तर न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे, त्यामुळे सगळ्यांचे ऐकून घ्यावे लागते. महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झाले आहे आणि बेरोजगार तरुणांना न्याय देणे गरजेचे आहे. हे सरकार त्यांचे प्रश्न सोडवेल व महाराष्ट्राला पुन्हा पुढे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.