ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहांची घाेषणा ‘जुमला’ ठरेल काय?
By निशांत वानखेडे | Published: June 29, 2024 05:28 PM2024-06-29T17:28:22+5:302024-06-29T17:28:52+5:30
ओबीसी विद्यार्थी संघटनांचा आराेप : पाच वर्षापासून विद्यार्थी वाऱ्यावर
निशांत वानखेडे, नागपूर
नागपूर : इतर मागासवर्गीय (ओबीसी) वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात ७२ वसतीगृह सुरू करण्याची घाेषणा करून ५ वर्षे लाेटली तरी एकही वसतीगृह सुरू झाले नाहीत. यावेळीही शैक्षणिक सत्र सुरू हाेऊनही काहीच हालचाली नसल्याने ओबीसी समाजाची अस्वस्थता वाढत आहे. अशात नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात ठळक असे काहीच नसल्याने ही घाेषणा म्हणजे ‘जुमला’ हाेय का, असा आराेप ओबीसी विद्यार्थी संघटनांकडून हाेत आहे.
ओबीसी युवा अधिकार मंचने ७२ वसतीगृह तत्काळ सुरू करावे म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूरचे सहायक संचालक यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. संघटनेचे संयाेजक उमेश काेर्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ साली पहिल्यांदा तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृह उभारण्याचे जाहीर केले हाेते. त्यानंतर पुन्हा २०२१ साली याेजनेचे नाव बदलून वसतीगृह सुरू करण्याबाबत घाेषणा झाली. पण घाेषणेपुढे काहीही झाले नाही. आता पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार बसून दाेन वर्षे झाली, तरी वसतीगृह सुरू झाली नाहीत. या बजेटमध्येही याबाबत काहीच स्पष्ट नाही.
लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेत ओबीसी विभागाद्वारे वसतिगृह सुरू करण्यासंंबंधी वेळापत्रक जाहीर करून आदेश देण्यात आले होते. वेळापत्रकानुसार ५ मार्च २०२४ पासून ओबीसी वसतिगृहे सुरू होणार होते. परंतु ते वेळापत्रक म्हणजे शासनाकडून पुन्हा एकदा गाजर दाखवण्याचा प्रयत्न झाला. आता २०२४-२५ चे शैक्षणिक सत्र सुरू हाेत असताना ओबीसींच्या वसतीगृहाबाबत काही हालचाली नसल्याने ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये असंताेष पसरत असल्याचे काेर्राम म्हणाले. यावेळी कृतल आकरे, पियूष आकरे, विनित गजभिये, आकाश वैद्य, मनीष गिरडकर, पंकज सावरबांधे, खेमराज मेंढे उपस्थित होते. वसतीगृह सुरू करण्यासह सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर कनिष्ठ महाविद्यालय आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहे आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेत सामावून घेण्याची मागणीही संघटनेने केली.
४५ इमारती भाड्याने घेतल्या?
ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांसाठी विविध जिल्ह्यात ४५ इमारती भाड्याने घेण्यात आल्याचे ओबीसी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. यातील सर्वाधिक २२ इमारती विदर्भातील जिल्ह्यात आहेत. मात्र शैक्षणिक सत्र सुरू हाेत असताना या वसतीगृहात प्रवेश कधी हाेईल, हा प्रश्न संघटनेने उपस्थित केला.