सरकार पेट्रोकेमिकल प्रकल्पाची सुरक्षितता पाहणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 08:46 PM2022-04-08T20:46:42+5:302022-04-08T20:48:15+5:30
Nagpur News कुठलाही प्रकल्प उभारत असताना त्याची सुरक्षिततादेखील तपासण्याची आवश्यकता असते. रत्नागिरीत सातत्याने चक्रीवादळांचा धोका असतो. त्या तुलनेत विदर्भात नैसर्गिक संकटांचा धोका कमी असल्याची भूमिका तज्ज्ञांनी मांडली आहे.
नागपूर : विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी यावी, अशी मागणी जोर धरत असताना राज्य शासनाने रत्नागिरीसाठी सकारात्मक संकेत दाखविले. त्यामुळे ही मागणी लावून धरणाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. कुठलाही प्रकल्प उभारत असताना त्याची सुरक्षिततादेखील तपासण्याची आवश्यकता असते. रत्नागिरीत सातत्याने चक्रीवादळांचा धोका असतो. त्या तुलनेत विदर्भात नैसर्गिक संकटांचा धोका कमी असल्याची भूमिका तज्ज्ञांनी मांडली आहे.
समुद्रकिनारा नसेल तरी पेट्रोकेमिकल रिफायनरी उभारली जाऊ शकते. या प्रकल्पासाठी मुबलक जमीन उपलब्ध असलेला विदर्भ हा चांगला पर्याय ठरू शकतो व याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र लिहिले होते. एकूण स्थिती व मागणीचा विचार करता रत्नागिरीपेक्षा नागपुरातच पेट्रोलियम कॉम्प्लेक्स-रिफायनरी व्यवहार्य असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
सर्वच बाबींचा विचार करता रत्नागिरीऐवजी नागपूरचाच विचार झाला पाहिजे. कोकणातील रत्नागिरी आणि आजूबाजूचा परिसर मान्सूनमध्ये अत्यंत संवेदनशील असतो. शिवाय किनाऱ्यांजवळ चक्रीवादळाचा नेहमीच धोका असतो व त्यामुळे मालमत्तेलादेखील धोका निर्माण होतो. दशकभरात चक्रीवादळांची संख्या वाढली असून, भविष्यात हा त्रास वाढू शकतो. त्या तुलनेत विदर्भ हवामानाच्या आघाड्यांवर अधिक सुरक्षित आहे. विदर्भ आणि मध्य भारत रत्नागिरी हवामान परिस्थितीच्या अगदी विरुद्ध आहे. वर्षभर हवेतील किमान आर्द्रता कमी असते व वातावरण बहुतेक कोरडे असते. विदर्भात कमी दाबाचे क्षेत्र किंवा इतर चक्रीवादळांचा धोकादेखील नसतो. त्यामुळे येथे गुंतवणूक सुरक्षित ठरेल. राजकीय कारणांसाठी रत्नागिरीचा आग्रह योग्य नाही, असे मत ‘वेद’चे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी व्यक्त केले.