फेब्रुवारीतच लागतील का उन्हाळ्याच्या झळा? कमाल, किमान तापमान सरासरीत
By निशांत वानखेडे | Published: February 3, 2024 06:29 PM2024-02-03T18:29:29+5:302024-02-03T18:33:16+5:30
फेब्रुवारी महिन्याचे तापमान जानेवारीप्रमाणेच असते व बऱ्यापैकी थंडीचा प्रभाव जाणवत असतो.
नागपूर: फेब्रुवारी महिन्याचे तापमान जानेवारीप्रमाणेच असते व बऱ्यापैकी थंडीचा प्रभाव जाणवत असतो. मात्र यावर्षी हवामान बदल व अल-निनोच्या प्रभावामुळे फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा वाढतील, असा अंदाज काही हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला होता. सध्यातरी दिवसरात्रीचा पारा सरासरीत आहे व दिवसाच्या उबदारपणासह रात्री थंडीचा प्रभाव जाणवतो आहे. पुढच्या काही दिवसातील बदलावरून वर्तविलेल्या स्थितीची स्पष्टता लक्षात येईल.
उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. दक्षिण-पश्चिम राजस्थानमध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्याने जम्मू-कश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जोराचा पाऊस तर त्या प्रभावाने विदर्भ, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नागपूरसह विदर्भात मात्र शनिवारी कुठेही पावसाची नोंद झाली नाही. दरम्यान दिवसरात्रीचे तापमान मात्र स्थिर न राहता वरखाली होत आहे. १ फेब्रुवारीला १७ अंशावर गेलेले किमान तापमान दुसऱ्या दिवशी ३ अंशाने घसरून १४.४ अंशावर परतले. दिवसाचा पारा ३०.४ अंश म्हणजे सरासरीत आहे. गोंदियात पारा सर्वात कमी १३.८ अंश आहे. उर्वरित जिल्ह्यात किमान तापमान १५ ते १७ अंशाच्या रेंजमध्ये म्हणजे सरासरीच्या आसपास आहे. फेब्रुवारी महिन्याचा गत १० वर्षाचा विचार केल्यास थंडीचा प्रभाव कायम होता. २०१९ ते २०२३ या ५ वर्षात किमान तापमान १० अंशाच्या खाली गेलेले आहे. २०१९ मध्ये १० फेब्रुवारीला ६.८ अंशाची नोंद झाली होती. २०१६ व २०१७ ला १२ अंशापर्यंत तापमान होते.
का घेतली जात आहे शंका?
यावर्षी काही मोजके दिवस वगळता कडाक्याच्या थंडीची फारसी जाणीव झाली नाही. डिसेंबर महिन्यात १९ व २० रोजी किमान तापमान १० अंशाच्या खाली गेले होते. जानेवारी महिन्यातही केवळ एक दिवस २५ जानेवारीला पारा ८.७ अंशावर गेला होता. त्यानंतर तो वाढतच गेला. १ फेब्रुवारीला तापमान १७ अंशावर होते. शिवाय उष्णतेचाही अनुभव येत आहे.