यंदा तरी होईल का प्रदूषणमुक्त दिवाळी?, दिल्ली, मुंबईनंतर नागपूरची हवा वाईट

By निशांत वानखेडे | Published: November 8, 2023 06:04 PM2023-11-08T18:04:39+5:302023-11-08T18:09:07+5:30

दिवाळीच्या काळात फटक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदुषणात आणखी भर : गेल्या वर्षी निर्देशांक ३००च्यावर

Will there be a pollution-free Diwali this year? After Delhi, Mumbai, Nagpur's air is bad | यंदा तरी होईल का प्रदूषणमुक्त दिवाळी?, दिल्ली, मुंबईनंतर नागपूरची हवा वाईट

यंदा तरी होईल का प्रदूषणमुक्त दिवाळी?, दिल्ली, मुंबईनंतर नागपूरची हवा वाईट

निशांत वानखेडे, नागपूर

 नागपूर : देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये वाढलेल्या प्रचंड प्रदूषणामुळे तेथील नागरिकांचा श्वास कोंडला आहे. नागपूरची स्थिती इतकी वाईट नसली तरी समाधानकारकही म्हणता येणार नाही. सण-उत्सवाच्या काळात प्रदूषणात मोठी वाढ होते. दिवाळीच्या काळात फटक्यांच्या आतषबाजीमुळे त्यात आणखी भर पडते. यामुळे प्रदूषणात कमतरता येईल, ही कल्पना अशक्यच वाटते आहे.

वाहनांची वाढलेली संख्या, कचरा जाळणे, बांधकामातून उडणारी धूळ व धुलिकणांमुळे नागपूरकरांनाही प्रदूषणाचा सामना करावा लागतो आहे. त्यात फटाक्यांच्या प्रदूषणाची आणखी भर पडते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ३० पैकी २९ दिवस हवेची गुणवत्ता वाईट होती. त्यात दिवाळीच्या फटाक्यांमुळे आणखी भर पडली व पाच दिवस गुणवत्ता निर्देशांक-एक्युआय ३००च्यावर पोहोचला होता. थंडीच्या काळात प्रदूषणात वाढ होतेच; पण फटाक्यांच्या धुरामुळे विषारी रसायने हवेत मिसळतात. विशेष म्हणजे गेल्या ऑक्टोबर महिन्यातच ३१ पैकी २१ दिवस प्रदूषणाचा स्तर अधिक होता. केवळ दोन दिवस हवा श्वास घेण्यालायक होती. नोव्हेंबरमध्ये तर दिवाळीच्या फटाक्यांमुळे ती अधिक विषारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील महाल, गांधीबाग, सीए रोड, सदर, धरमपेठ, खामला, मानेवाडा या भागात एक्युआय ३००च्या आसपास गेला होता. पीएम-१० धुलिकणांचा स्तर ३५० ते ४०० पर्यंत पोहोचला होता. 

वायू प्रदूषणासह ध्वनी प्रदूषण हीसुद्धा नागपूरकरांची समस्या ठरली आहे. नीरीच्या अध्ययनानुसार गेल्या वर्षीही ध्वनी प्रदूषण सामान्यपेक्षा कितीतरी अधिक होता. हनुमाननगर, नेहरूनगर, आसीनगर, सतरंजीपुरा, लक्ष्मीनगर, लकडगंज व मंगळवारी झोनमध्ये ध्वनी प्रदूषणाचा स्तर ७५ ते ८० डेसिबलच्या वर जाताे. त्यामुळे कानठळ्या बसविणारे प्रदूषण धोकादायक स्थितीत जाईल, हे नाकारता येत नाही.

फटाक्यांतून निघतात हे प्रदूषित वायू

फटाके तयार करताना कॉपर, झिंक, लेड, सोडियम, मॅग्नेशियम, कॅडिमयम यांसारख्या घातक धातूंचा वापर केला जातो. फटाके फोडल्यानंतर सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड या वायूंचे तसेच निकेल, कॅडिमयम, क्रोमियम या जड धातूंचे उत्सर्जन होते, जे प्रदषणू वाढण्यास कारणीभूत ठरते. शिवाय धुलिकणांचा धोकादायक स्तर वाढतो.

आजाराला निमंत्रण

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते फटाक्यामुळे धोकादायक रसायने हवेत मिसळतात. यामुळे दमा रुग्णांचा त्रास बळावतो. श्वसनाचे अनेक आजार वाढतात. धुलिकणांसह ही रसायने शरीरात जातात व त्यामुळे कॅन्सरसारखे घातक आजार वाढण्याचा धोका असतो.

Web Title: Will there be a pollution-free Diwali this year? After Delhi, Mumbai, Nagpur's air is bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.