पुन्हा लॉकडाऊन लागणार का? 'चित्रीकरण वेगाने आटपा'चा इशारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 06:59 PM2022-01-03T18:59:43+5:302022-01-03T19:21:13+5:30

Nagpur News राज्यात कोरोना संक्रमणाचा वाढता वेग आणि नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन व तिसऱ्या लाटेचा अंदाज बघता निर्मात्यांची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे, निर्मात्यांनी चित्रीकरणाचा वेग वाढवा, वेगाने कामे आटपा... असले संदेश दिग्दर्शक व कलावंतांना धाडले आहेत.

Will there be a lockdown again? Shoot fast! | पुन्हा लॉकडाऊन लागणार का? 'चित्रीकरण वेगाने आटपा'चा इशारा!

पुन्हा लॉकडाऊन लागणार का? 'चित्रीकरण वेगाने आटपा'चा इशारा!

Next
ठळक मुद्दे निर्मात्यांचा दिग्दर्शक, कलावंतांना संदेश कोरोना संक्रमणामुळे सांस्कृतिक क्षेत्रावर चिंतेचे सावट

नागपूर : लॉकडाऊन उठल्यापासून अनेक महिने रखडलेल्या चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला वेग चढला आहे आणि कलावंत, निर्मात्यांच्या मनात उत्साह निर्माण झाला आहे. मात्र, राज्यात कोरोना संक्रमणाचा वाढता वेग आणि नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन व तिसऱ्या लाटेचा अंदाज बघता निर्मात्यांची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे, निर्मात्यांनी चित्रीकरणाचा वेग वाढवा, वेगाने कामे आटपा... असले संदेश दिग्दर्शक व कलावंतांना धाडले आहेत.

कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्वप्रथम सांस्कृतिक क्षेत्रच लॉकडाऊन करण्यात आले होते. चित्रपट व दूरचित्रवाणीवर प्रसारित होणाऱ्या डेलिसोपवर विसंबून असलेल्या अनेक कलावंत व कामगारांच्या रोजगाराला फटका बसला होता. अनेक कलावंत व कामगार यामुळे रस्त्यावर आले होते. त्यानंतर लॉकडाऊन उठताच या क्षेत्राला संजीवनी प्राप्त झाली असतानाच, पुन्हा तिसऱ्या लाटेचा तांडव बघता कलाक्षेत्रात धास्ती निर्माण झाली आहे. नववर्षाच्या अनुषंगाने अनेक कलावंत व कामगारांना नियोजित व्हॅकेशन देण्यात आले होते. मात्र, याच दरम्यान राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा म्हणता म्हणता दररोज सहा-आठ-११ हजारांच्या पलीकडे गेला आहे. चित्रनगरी म्हणून ओळख असलेल्या एकट्या मुंबईत ८० टक्के रुग्ण आढळत आहेत. त्याचा धसका म्हणून व्हॅकेशनवर असलेल्या सर्व कलावंतांना निर्मात्यांकडून तातडीने चित्रीकरणास बोलविण्यात आले आहे. नागपूर व विदर्भात असलेले अनेक कलावंत व्हॅकेशन अर्ध्यावर सोडून चित्रीकरणाला पळाले आहेत.

चित्रीकरण स्थळी प्रचंड लगबग

दूरचित्रवाणीवरील विविध वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या मालिकांचे चित्रीकरण सध्या मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आदी ठिकाणी सुरू आहे. या अनेक मालिकांमध्ये नागपूर, अमरावती, पुसद, भंडारा व विदर्भातील अन्य जिल्ह्यांतील कलावंत प्रमुख भूमिकेत झळकले आहे. अनेक कलावंत तांत्रिक बाबींमध्येही सहभागी आहेत. चित्रीकरण स्थळावर लगबगीने ते पोहोचत आहेत.

९ जानेवारीच्या आधी कामे आटपा

संक्रमितांची संख्या वेगाने वाढत असल्याने ९ जानेवारीपर्यंत चित्रीकरण आटपा. कदाचित तेव्हापासून लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे... अशी भीती व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती एका कलावंताने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

...............

Web Title: Will there be a lockdown again? Shoot fast!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.