विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ऑनलाईनच होणार? लवकरच होणार घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 08:41 PM2021-11-18T20:41:53+5:302021-11-18T20:42:21+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार याबद्दल संभ्रम आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार याबद्दल संभ्रम आहे. विद्यापीठाने या संदर्भातील आपली भूमिका अद्याप स्पष्ट न केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ऑनलाईनच होणार आहेत तर, उन्हाळी परीक्षा ऑफलाईन घेतल्या जातील, अशी माहिती आहे. परीक्षा विभाग लवकरच या संदर्भात अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे. परीक्षासंदर्भात अलिकडेच परीक्षा मंडळाची बैठक झाली होती. यात परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात की ऑफलाईन यावर चर्चेचा प्रस्ताव आला होता. या मुद्यावरून झालेल्या दीर्घ चर्चेनंतर कोरोना संक्रमणाची स्थिती लक्षात घेऊन हिवाळी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शविल्याची माहिती आहे. उन्हाळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाव्यात. विद्यार्थ्यांच्या मनावर मानसिक ताण येऊ नये आणि त्यांना मानसिक दृष्ट्या स्वत:ला तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी परीक्षा घेण्याच्या दोन महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांना याची माहिती दिली जावी, असेही या बैठकीत ठरले. तथापि, सर्व सेमिस्टरच्या परीक्षा विद्यापीठ ऑफलाईन पद्धतीने घेणार की ५०-५० या धोरणानुसार घेतल्या जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूत्रांच्या मते, परीक्षा मंडळाने हा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवला आहे. कोरोना संक्रमणाची स्थिती असल्याने यावर पूर्णत: विचार केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. परिस्थिती पूर्णत: पूर्वपदावर आली तरच विद्यापीठ सर्व सेमिस्टर परीक्षा घेणार आहे.
उल्लेखनीय असे की, कोरोना संक्रमणामुळे विद्यापीठाने २०२० पासून ऑनलाईन परीक्षा घेतल्या आहेत. उन्हाळी परीक्षाही ऑनलाईनच झाल्या आहेत. नागपूर शहरासोबतच विभागातील सर्वच जिल्ह्यात कोरोना संक्रमाणाची गती मंदावली आहे. महाविद्यालयेही आता उघडायला लागली आहेत. हे लक्षात घेता परीक्षा विभागाने परीक्षा मंडळाच्या बैठकीत हिवाळी परीक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता.