विदर्भात मिळेल का ‘आप’ला साथ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:51 PM2019-09-25T12:51:53+5:302019-09-25T12:53:43+5:30

२०१४ च्या लोकसभेत विदर्भाने ‘आप’वरच झाडू चालविल्याचा इतिहास डोळ्यासमोर आहे. त्यामुळे सर्व ६२ जागांवर लढून आपल्यामागील ताप न वाढविता निवडक १५ जागांवर ‘फोकस’ केला जात आहे.

Will Vidarbha stand with Aap? | विदर्भात मिळेल का ‘आप’ला साथ?

विदर्भात मिळेल का ‘आप’ला साथ?

Next
ठळक मुद्दे१५ जागांवर फोकस २०१४ च्या लोकसभेत कामगिरी सुमार

कमलेश वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीत दुबळ्या झालेल्या काँग्रेसचा फायदा आम आदमी पार्टीने घेत काँग्रेसवर झाडू चालविला होता. गेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर विदर्भात काँग्रेसला घरघर लागली आहे. आता या परिस्थितीचा फायदा उचलत विदर्भात पाय रोवण्यासाठी ‘आप’च्या पोल मॅनेजर्सनी रणनीती आखली आहे. मात्र, २०१४ च्या लोकसभेत विदर्भाने ‘आप’वरच झाडू चालविल्याचा इतिहास डोळ्यासमोर आहे. त्यामुळे सर्व ६२ जागांवर लढून आपल्यामागील ताप न वाढविता निवडक १५ जागांवर ‘फोकस’ केला जात आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात ‘आप’ची कामगिरी सुमार राहिली. चंद्रपुरात माजी आमदार वामनराव चटप यांना वैयक्तिक ताकदीवर २ लाख ४ हजार ४१३ मते मिळाली. नागपुरात तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासारख्या चर्चेतील चेहरा समोर केला असतानाही दमानियांना ६९ हजारावर पोहचविण्यात कार्यकर्त्यांचीच दमछाक झाली. भंडारा-गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ-वाशीम व बुलढाणा या मतदारसंघात तर १० हजारही मते मिळविता आली नाही. चाचपणीतच निकाल कळाल्याने त्यानंतर झालेल्या २०१४ ची विधानसभा व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून ‘आप’ दूरच राहिली.
आता अचानक विधानसभेसाठी आठ उमेदवारांची घोषणा करीत ‘आप’ने एन्ट्री घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांची उमेदवारी जाहीर करून ‘आप’ने चर्चेतील ‘सोशल फेस’ दिला आहे. उर्वरित जागांवरही असेच तोडीचे उमेदवार देण्यासाठी पक्षाची चाचपणी सुरू आहे. ‘आप’च्या उमेदवारीसाठी पक्षाच्या वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाची पडताळणी करून पक्षाच्या आचारसंहितेत बसणाऱ्यांना मुंबईला मुलाखतीला बोलाविले जात आहे. पक्षाच्या नागपूर कार्यालयातदेखील अर्ज भरण्याची सोय करण्यात
आली आहे.

‘आप’ने महापालिकेच्या निवडणुकी वेळीच तयारी केली होती. पण काही कारणास्तव निवडणूक लढली नाही. विधानसभेसाठी विदर्भात नियोजन बैठका सुरू आहेत. किमान १५ जागा लढविल्या जातील. नागपूर शहरातील दक्षिण-पश्चिम, पश्चिम व मध्य नागपूर तर ग्रामीणमधील रामटेक अशा चार मतदार संघांवर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील तीन मतदार संघांसाठी सहा इच्छुकांनी तर रामटेकसाठी दोघांनी मुलाखती दिल्या आहेत.
- देवेंद्र वानखेडे, सदस्य, राज्य प्रचार समिती, ‘आप’

चारित्र्यवानच ‘इनकमिंग’ स्वीकारणार
सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. कालपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना आज लगेच दुसºया पक्षात सामावून घेतले जात आहे. ‘आप’चाही प्रमुख पक्षातील बंडखोरांवर डोळा आहे. मात्र, संबंधितांना पक्षात प्रवेश देताना त्याचे चारित्र्य, शिक्षण, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का, आदी बाबी तपासूनच प्रवेश दिला जावा, असा ठरावच ‘आप’च्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या निकषांचे तंतोतंत पालन केले जाईल, असा दावाही ‘आप’च्या नेत्यांनी केला आहे.

Web Title: Will Vidarbha stand with Aap?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :AAPआप