चंद्रावर झोपलेले विक्रम व प्रज्ञान पुन्हा जागे होतील काय?
By निशांत वानखेडे | Published: September 20, 2023 04:32 PM2023-09-20T16:32:37+5:302023-09-20T16:36:48+5:30
२२ सप्टेंबरला संपेल १४ दिवसाची रात्र : इस्रोच्या वैज्ञानिकांना विश्वास
निशांत वानखेडे
नागपूर : चंद्रावर १४ दिवस आपल्या लीला दाखविल्यानंतर झोपी गेलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागे होतील काय, हा प्रश्न आता सर्व भारतीयांच्या मनात दडलेला आहे. पृथ्वीवरच्या १४ दिवस चाललेली चंद्रावरची एक रात्र लवकरच संपणार असून २२ सप्टेंबरला तेथे सूर्योदय होणार आहे. सूर्योदय होताच विक्रम व प्रज्ञान पुन्हा जागे होऊन कामाला लागतील, अशी अपेक्षा इस्रोच्या वैज्ञानिकांना आहे.
भारताची चंद्र मोहीम, चांद्रयान-३ ने २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या स्पर्श केला.चांद्रयान-३ चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांनी पृष्ठभागावर अभ्यास केला आणि विविध निष्कर्ष भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोला पाठविले. सर्व पेलोड्समधील डेटा विक्रम लँडरद्वारे पृथ्वीवर प्रसारित केला गेला. विक्रम आणि प्रज्ञान यांची रचना एक चंद्र दिवस (पृथ्वीवरील १४ दिवस) करण्यासाठी करण्यात आली होती. त्यानंतर चंद्रावरचे वातावरण लक्षात घेता ४ सप्टेंबर रोजी या दोघांनाही स्लीप मोडवर ठेवण्यात आले आहे. इस्रोनुसार लँडर आणि रोव्हर २२ सप्टेंबरला सूर्योदय होताच जागे होण्याची अपेक्षा आहे. चांद्रयान-३ ची बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली आहे आणि २२ सप्टेंबर रोजी अपेक्षित चंद्रावरील सूर्योदयाच्या वेळी सौर पॅनेलला प्रकाश मिळेल. जर ते २२ सप्टेंबर रोजी जागे झाले नाहीत, तर ते ‘भारताचे चंद्र राजदूत’ म्हणून कायमचे तेथे राहतील, असे इस्रोने नमुद केले आहे.
विक्रम लँडर ज्या स्थानावर उतरला त्याच स्थानावर राहिला, तर प्रज्ञान रोव्हर लँडिंगच्या काही तासांनंतर लँडरमधून बाहेर पडले आणि चंद्राच्या मातीवर चालण्यास सुरुवात केली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर माेहिम यशस्वी करणारा भारत पहिला ठरला आहे.
विक्रम लँडरला का झोपवले?
४ सप्टेंबर रोजी विक्रम लँडरला स्लीप मोडमध्ये ठेवण्यात आले होते जेणेकरून ते चंद्राच्या रात्रीच्या कठोर वातावरणात टिकून राहू शकेल. चंद्राच्या रात्री, चंद्र प्रचंड अंधाराने भरलेला असतो आणि तेथे जवळजवळ उणे २०० अंश गोठवणारे तापमान असते. अशा कठोर वातावरणात तांत्रिक उपकरणे टिकून राहणे अशक्य आहे.
प्रज्ञान हीटरने सुसज्जित
प्रज्ञान रोव्हर हीटरने सुसज्ज आहे, ज्याला रेडिओआयसोटोप हीटर युनिट्स (आरएचयु) लावले आहे. ते हार्डवेअर ऑनबोर्ड स्पेसक्राफ्टला टिकाऊ ऑपरेटिंग तापमानात ठेवण्यासाठी उष्णता पसरवतात. हे हीटर्स अंतराळ मोहिमेतील एक आवश्यक भाग आहेत, जे प्लुटोनियम किंवा पोलोनियमच्या किरणोत्सर्गी आवृत्त्यांच्या नैसर्गिक क्षयातून निर्माण झालेल्या उष्णतेचे विद्युत शक्तीमध्ये रुपांतर करतात.