खैरलांजी हत्याकांडातील आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांना मत देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:48 AM2019-04-09T00:48:18+5:302019-04-09T00:49:14+5:30

बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी हे भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन करीत आहेत. तेव्हा खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष आणि खैरलांजी हत्याकांडानंतर झालेल्या आंदोलनातील एक प्रमुख कार्यकर्ते रवी शेंडे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत उपस्थित केला.

Will vote for those who support the accused in the Khalarangi killings? | खैरलांजी हत्याकांडातील आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांना मत देणार का?

खैरलांजी हत्याकांडातील आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांना मत देणार का?

Next
ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचा सवाल :काँग्रेस-भाजप सारखेच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी हे भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन करीत आहेत. तेव्हा खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष आणि खैरलांजी हत्याकांडानंतर झालेल्या आंदोलनातील एक प्रमुख कार्यकर्ते रवी शेंडे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत उपस्थित केला.
रवी शेंडे म्हणाले,भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. त्यामुळे त्याला हरवणे आवश्यक आहे. परंतु बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी लोक भाजपची भीती दाखवून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. हे बरोबर नाही. त्यांना काँग्रेसचा प्रचार करायचाच असेल तर उघडपणे करावा, परंतु छुपा अजेंडा चालवू नये. काँग्रेसने ७० वर्षांपासून आपल्या समाजावर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात अन्याय केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये निवडून येऊ नये म्हणून कॉँग्रेसनेच प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत निवडून येऊ दिले नाही. दोनवेळा त्यांचा पराभव केला. इतकेच नव्हे तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना हिंदू स्मशान भूमीत जागा देण्यासाठी मज्जाव केला. हा इतिहास आम्ही विसरणार आहोत का? असा प्रश्नही शेंडे यांनी उपस्थित केला.
संपूर्ण जगाला हादरवून टाकणारे खैरलांजी हत्याकांड भंडारा जिल्ह्यात घडले. भोतमांगे कुटुंबाला संपवण्यात आले. देशात जेव्हा कधी समाजावर जातीय हल्ले होतात, तेव्हा खैरलांजीचे उदाहरण दिले जाते. इतके अमानुष ते हत्याकांड होते. या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून देशभरात आंदोलन झाले. आम्हीही त्यात सहभागी होतो. हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. हजारो तरुण तुरुंगात गेले. हजारोंनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. इतकेच नव्हे तर अनेक जण गोळीबरालाही सामोरे गेले. परंतु त्याच वेळी खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना वाचविण्याचे काम काही नेतेमंडळी करीत होते. अशा लोकांना काँग्रेसने उमेदवारी दिली. तेव्हा अशा लोकांच्या पाठीमागे समाजाने कसे उभे राहावे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
खैरलांजीचा लढा संपलेला नाही
खैरलांजी हत्याकांडातील आरोपीला शिक्षा मिळावी यासाठी समाजाचा लढा आजही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तो संपलेला नाही, याची आठवणही रवी शेंडे यांनी यावेळी करून दिली.
वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय
काँग्रेस-भाजपा सारखेच आहे. बौद्ध आंबेडकरी समाजाचे एकूणच वंचित समाजाचे भले हे दोन्ही पक्ष करू शकत नाही. त्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांनी निर्माण केलेली वंचित बहुजन आघाडी ही एक सक्षम पर्याय आहे. त्यामुळे समाजाने या आघाडीच्या पाठीमागे उभे राहावे, असे आवाहनही रवी शेंडे यांनी केले.

Web Title: Will vote for those who support the accused in the Khalarangi killings?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.