वाघिणीचा तिसरा बछडा असेल का जीवित ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:08 AM2021-03-22T04:08:07+5:302021-03-22T04:08:07+5:30
नागपूर : कऱ्हांडलाच्या जंगलात टी-१ वाघिणीच्या दुसऱ्या बछड्याचाही मृत्यू झाला. उपाशीपोटी फिरणाऱ्या दोन बछड्यांच्या अस्तित्वाचे पुरावे चार दिवसांपूर्वी मिळाल्यावर ...
नागपूर : कऱ्हांडलाच्या जंगलात टी-१ वाघिणीच्या दुसऱ्या बछड्याचाही मृत्यू झाला. उपाशीपोटी फिरणाऱ्या दोन बछड्यांच्या अस्तित्वाचे पुरावे चार दिवसांपूर्वी मिळाल्यावर एकाचा मृत्यू झाला. आता तिसरा बछडा तरी जीवित असेल का, अस प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित होत आहे.
टी-१ वाघिणीचा बघडा मृतावस्थेत आढळल्यावर उरलेल्या दोन बछड्यांच्या शोधासाठी कऱ्हांडलाच्या बिटमध्ये वनविभागाने शोध घेतला होता. १६ मार्चला दुपारी अडीच वाजता ट्रॅप कॅमेरामध्ये एकाचे छायाचित्र आले होते. याच दिवशी सायंकाळी दुसऱ्याचे पगमार्क आढळले होते. या घटनेला चार दिवस लोटत नाही तोच छायाचित्रात दिसलेला बछडा शनिवारी मृतावस्थेत आढळला. आता सर्वांचे कान तिसऱ्या बछड्याची माहिती ऐकून घेण्यासाठी टवकारले आहेत. मात्र, अद्यापही त्याची कसलीही माहिती नाही. चार दिवसांपूर्वी त्याचे पगमार्क आढळले होते. शिकार करण्यास असमर्थ असलेल्या या बछड्यांना जंगलात उपास घडत असल्याने चिंता व्यक्त होत होती. वाचलेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला. आता तिसरा बछडा जीवित असेल का, याचे उत्तर वनविभागही स्पष्टपणे द्यायला तयार नाही.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते या जंगलात रानकुत्रे मोठ्या प्रमाणावर आहेत. आईसोबत केवळ सहा ते सात महिने राहिलेल्या या बछड्याला शिकारीचे आणि स्वसंरक्षणाचे तंत्र अवगत नाही. उपासाने दुर्बलता आलेली असल्याने त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नसल्याने सध्यातरी सारेच अनभिज्ञ आहेत.