विदेशासारखा दंड केला, तरच आम्ही सुधारणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:28 PM2020-03-24T12:28:52+5:302020-03-24T12:30:20+5:30
दंड आणि शिक्षेचे कलम वाढविल्यावरच आम्ही सुधारणार आहोत का, असा प्रश्न विचारण्याची पाळी आता आली आहे.
गोपालकृष्ण मांडवकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि ही साखळी तोडण्यासाठी पंतप्रधानांनी २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. लोकांनी तो पाळलेही. पण दिवसभर कमावले, अन् संध्याकाळी गमावले, अशी स्थिती शहरातील काही भागात दिसली. लोकांनी फटाके फोडले, कुणी थेट रस्त्यावर येऊन नृत्य केले तर कुणी नेतागिरी करण्याची संधी साधत रॅलीही काढण्याचा प्रयत्न केला. हे सर्व पाहू जाता, विदेशासारखा दंड आणि शिक्षा केली तरच आम्ही सुधारणार का, असा प्रश्न विचारण्याची पाळी आली आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले आहे. आॅटो, शहर बस सेवा, रेल्वे सेवाही ठप्प केली आहे. हे आदेश आता ३१ मार्चपर्यंत राहणार आहेत. या काळात जनता एकमेकांच्या संपर्कात कमी यावी, त्यातून कोरोनाचा प्रसार टळावा, कोरोनाचे जंतू संपर्कात न आल्याने नैसर्गिकरीत्या नष्ट व्हावेत, हा त्यामागील हेतू आहे. या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी जमावबंदीचे १४४ कलमही लावले आहेत. तरीही अनेक अतिउत्साही लोकांनी कर्फ्यू कसा आहे, या उत्सुकतेपोटी शहरात मित्रांसह फेरफटका मारण्याचा प्रयत्न केला. कुणी निर्मनुष्य रस्त्यावर सेल्फी काढून सोशल मीडियावरून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शनही केले. फटाक्यांमुळे प्रदूषण होते हे माहीत असतानाही सायंकाळी फटाके फोडून आपल्या मूर्खपणाचे दर्शन घडविले. त्यामुळे आम्ही एवढे बेफिकीर कसे, असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण होत आहे.
संपूर्ण जग कोरोनासाठी कडक उपाययोजना करीत आहे. भारतामध्येही कायद्याचा वापर यासाठी केला जात आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतामधील दंडाची आणि शिक्षेची रक्कम कमी आहे. युरोपियन राष्ट्रानी कोरोनाच्या काळात कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड, स्वित्झर्लंड, फ्रान्स, नेदरलँड, आॅस्ट्रिया यासारख्या राष्ट्रानी नागरिकांवर कडक निर्बंध लादले आहेत. कुणी घराबाहेर निघाला किंवा रस्त्यावर आला तर त्याला पोलीस थेट उचलून नेतात. कुठे नेतात, त्याचे काय करतात, याचा थांगपत्ताही लागत नाही, असे अनुभव तिथे राहणाऱ्या भारतीयांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. युरोपमध्ये तर फिरताना आढळल्यास २४ हजार ते ४० हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारणे सुरू केले आहे. जर्मनीमध्ये १२ वर्षांची कैद सुनावली जात आहे. चीनमध्येही अशीच स्थिती आहे. भारतामध्येही अशाच
प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी १४४ कलम लावले आहे, मात्र नागरिक बेफिकिर आहेत. चौकातील पोलीस फार तर चार दंडुके मारतील आणि समज देऊन सोडून देतील, असा सर्वांचा समज असेल तर, कदाचित कायद्यालाही कडक व्हावे लागेल. म्हणूनच दंड आणि शिक्षेचे कलम वाढविल्यावरच आम्ही सुधारणार आहोत का, असा प्रश्न विचारण्याची पाळी आता आली आहे.