वेगळ्या विदर्भासाठी हवा दृढ निर्धार

By admin | Published: May 8, 2015 02:21 AM2015-05-08T02:21:47+5:302015-05-08T02:21:47+5:30

दांडेकर समिती, केळकर समिती झाली. या समितीच्या अहवालावरच महाराष्ट्र झुलत आहे ..

Wind determination for a different Vidharbha | वेगळ्या विदर्भासाठी हवा दृढ निर्धार

वेगळ्या विदर्भासाठी हवा दृढ निर्धार

Next

नागपूर : दांडेकर समिती, केळकर समिती झाली. या समितीच्या अहवालावरच महाराष्ट्र झुलत आहे पण विदर्भाला काहीही मिळाले नाही. अनेकांच्या फसव्या आश्वासनांवर वैदर्भीयांनी विश्वास ठेवला आणि शोषण सुरूच राहिले. विदर्भ आपला आहे आणि तो मागण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण केवळ पुस्तकांनी विदर्भ वेगळा होणार नाही. त्यासाठी राजकीय नेत्यांची, जनतेची दृढ इच्छाशक्ती असली पाहिजे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले.
विश्वस्त प्रकाशनाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार, लेखक प्रभाकर कोंडबत्तुनवार यांच्या ‘आरसा विदर्भाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात गुरुवारी करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे, रणजित मेश्राम, प्राचार्य बबन तायवाडे, माजी कुलगुरु हरिभाऊ केदार आणि लेखक प्रभाकर कोंडबत्तुनवार उपस्थित होते. डॉ. खांदेवाले म्हणाले, ३४ हजार आत्महत्या ज्या प्रदेशात होतात, त्या प्रदेशाने पुन्हा उभे राहुच नये का? या पुस्तकातून आपण एक धडा घ्यायला हवा, हे आपले राज्य आहे आणि ते आपल्याला मिळायलाच हवे. त्याशिवाय विदर्भाचे शोषण थांबणार नाही.
विदर्भाचा इतिहास, माणसे, नेते आणि आकडेवारी समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. हरिभाऊ केदार म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर कुठल्याही भागावर अन्याय होणार नाही, अशा वल्गना करण्यात आला पण अन्याय झालाच, हा इतिहास आहे. या पुस्तकातून हा सारा इतिहास अभ्यासपूर्णतेने आला आहे. बबनराव तायवाडे म्हणाले, या पुस्तकामुळे विदर्भाबाबतच्या माझ्या भूमिका स्पष्ट झाल्या. हे पुस्तक वैदर्भीयांची मानसिकता तयार करेल, यात शंका नाही. रणजित मेश्राम म्हणाले, वेगळ्या विदर्भाबाबत शिवसेनेने भूमिका घेतली पण काँग्रेस, भाजपाने भूमिकाच घेतली नाही. तेलंगणा वेगळा झाला कारण राजकीय भूमिका होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विदर्भाबाबत त्यांची भूमिका विचारण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. उमेश चौबे म्हणाले, विदर्भाबाबतची आपली निष्ठाच कमी पडत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. विश्वासघात होत असताना शोषणाची प्रतिक्रियाही नसावी, हे दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक बबन नाखले यांनी तर पुस्तकाची भूमिका प्रभाकर कोंडबत्तुनवार यांनी सांगितली. संचालन अशोक भड तर आभार विठ्ठलराव कोंबाडे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Wind determination for a different Vidharbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.