निडोज बारमध्ये आढळला मद्यसाठा
By admin | Published: July 2, 2017 02:24 AM2017-07-02T02:24:24+5:302017-07-02T02:24:24+5:30
जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार धंतोलीतील बहुचर्चित निडोज बार आणि रेस्टॉरेंटमध्ये राज्य उत्पादन शुल्क (स्टेट एक्साईज) विभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार धंतोलीतील बहुचर्चित निडोज बार आणि रेस्टॉरेंटमध्ये राज्य उत्पादन शुल्क (स्टेट एक्साईज) विभाग आणि पोलिसांनी छापा घातला. यावेळी येथे विनापरवाना आॅर्केस्ट्रा चालविला जात असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, या आॅर्केस्ट्रात मुंबईसह बाहेरगावच्या तरुणी आढळून आल्या. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात उंची दारूचा साठाही सापडला. अधिकाऱ्यांनी तो जप्त करून बारमालक राजू ऊर्फ राजीव प्यारेलाल जयस्वाल (रा. बांते ले-आऊट, सोमलवाडा) याला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
राज्य महामार्गावरील ५०० मिटरवरील बार आणि मद्यालये बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होताच उपराजधानीतील अनेक बार आणि मद्यालये बंद झाली. त्यात मुंजे चौकातील निडोज बारचाही समावेश आहे. मात्र, बाहेरून हा बार बंद झाल्याचे दिसत असले तरी आतमध्ये मद्यसाठा ठेवून ग्राहकांना विक्री केली जात असल्याचे तसेच डान्स बारही चालविला जात असल्याची गुप्त तक्रार जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना मिळाली.
हॉटेलमधील भूलभूलय्या
निडोज बार आणि रेस्टॉरंट नवीन व्यक्तीसाठी एखाद्या भूलभूलय्यासारखेच असल्याचे कारवाई करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. कोणत्याही गल्लीतून गेल्यानंतर संबंधित नवीन व्यक्ती जुन्याच जागी परत येते. येथील काही रूममधल्या भिंतींवर चारही बाजूने काचा (आरसे) लावल्या आहेत. त्या काचेच्या भिंतींमध्येच एका काचेच्या भिंतीतील दाराला धक्का देऊन आतमध्ये जावे लागते, असे हा अधिकारी म्हणाला.
मनोरंजन करही थकीत
विशेष म्हणजे, निडोज बार आणि रेस्टॉरंटमधील आॅर्केस्ट्राला ३१ डिसेंबर २०१६ पर्यंतच परवानगी होती. त्यानंतर नूतनीकरण करून परवानगी न घेताच येथे आॅर्केस्ट्रा व गझलचे आयोजन सुरू होते. सूत्रानुसार, निडोज बारच्या संचालकाने आॅर्केस्ट्रा व गझलचे आयोजनासाठी मनोरंजन कर मार्च २०१७ पर्यंतच भरला होता. एप्रिल २०१७ नंतरचा मनोरंजन करही थकीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान आॅर्केस्ट्रात काम करणाऱ्या चारही तरुणींची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी सांगितले.