उंच भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये बळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:31 PM2018-06-09T14:31:04+5:302018-06-09T14:31:28+5:30

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम म्हणायचे, मोठी स्वप्न पहा. त्यातून भरारी घेण्याची शक्ती मिळते. त्यांच्या आदर्शातून तिने आयुष्यात मोठे होण्याची स्वप्ने पाहिली अन् करिअरची पहिली पायरी मानण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत यशदेखील मिळविले. परंतु तिच्या चेहऱ्यावर गुणांच्या आनंदापेक्षा पुढील शिक्षण कसे करायचे याची चिंता दिसून येत होती. पैशाअभावी मोठे स्वप्न गाठता येणार नाही, असेच तिला वाटत असल्याने उच्च शिक्षणाच्या स्वप्नांनाच बासनात गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कुणालाही अंतर्मुख करायला लावेल अशी ही कहाणी आहे, शांतिनगर येथील विनायकराव देशमुख हायस्कूलची विद्यार्थिनी प्रगती प्रदीप साखरे हिची.

Wings do not have the strength to take a high fly | उंच भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये बळ नाही

उंच भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये बळ नाही

Next
ठळक मुद्देयश मिळूनदेखील प्रगतीची खंत : पैसा नसल्यामुळे स्वप्नांनाच कोंडले

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम म्हणायचे, मोठी स्वप्न पहा. त्यातून भरारी घेण्याची शक्ती मिळते. त्यांच्या आदर्शातून तिने आयुष्यात मोठे होण्याची स्वप्ने पाहिली अन् करिअरची पहिली पायरी मानण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत यशदेखील मिळविले. परंतु तिच्या चेहऱ्यावर गुणांच्या आनंदापेक्षा पुढील शिक्षण कसे करायचे याची चिंता दिसून येत होती. पैशाअभावी मोठे स्वप्न गाठता येणार नाही, असेच तिला वाटत असल्याने उच्च शिक्षणाच्या स्वप्नांनाच बासनात गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कुणालाही अंतर्मुख करायला लावेल अशी ही कहाणी आहे, शांतिनगर येथील विनायकराव देशमुख हायस्कूलची विद्यार्थिनी प्रगती प्रदीप साखरे हिची.
प्रगतीचे वडील हे रिक्षाचालक असून कुटुंबाचा गाडा चालविताना त्यांची ओढाताण होते. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत असलेल्या साखरे कुटुंबीयांना प्रगतीकडून खूप आशा होत्या. तिनेदेखील दहावीच्या संपूर्ण वर्षात खूप मन लावून अभ्यास केला. जवळ पुस्तके आणि इतर मूलभूत सोयी नसतानादेखील प्रगतीने अभ्यासाचे शिवधनुष्यदेखील पेलले आणि ८८ टक्के गुण मिळवत यश मिळविले. मात्र हे यश मिळवूनदेखील आनंद साजरा करण्याजोगी तिची परिस्थिती अजिबात नाही.
घरी अठराविश्वे दारिद्र्य असल्यामुळे पुढील शिक्षण कसे घ्यायचे हाच तिच्यासमोर प्रश्न आहे. सर्वसाधारण व्यक्तीला तिच्या मनात सुरू असलेल्या द्वंद्वाचा विचारदेखील करता येणार नाही, अशी तिची स्थिती आहे. उच्चशिक्षण घ्यायचे तिचे स्वप्न आहे. मात्र परिस्थिती ओळखून असल्यामुळे कसेतरी पदवी घेऊन कुठेतरी लहानमोठी नोकरी मिळाली तरी पुरेसे आहे, असेच ती सांगते आहे. मात्र तिच्या डोळ्यांतून तिच्या स्वप्नांचा अंदाज सहज बांधता येतो.
आईवडिलांचे डोळे पाणावले
विनायकराव देशमुख हायस्कूलचे प्राचार्य प्रदीप बिबटे ज्यावेळी प्रगतीच्या घरी पोहोचले, तेव्हा तिच्या आईवडिलांना विश्वासच बसला नाही. मुलीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाईदेखील आणू शकले नव्हते. बिबटे यांनी त्यांचादेखील सत्कार केला व मिठाईचा घास भरविला. मुलीचे यश पाहून मायबापाचे डोळे भरून आले व बराच वेळ अश्रूधारा वाहत होत्या. प्रगतीला चांगले शिक्षण घ्यायचे आहे, मात्र परिस्थितीअभावी ती पुढील मार्गच ठरवू शकलेली नाही, असे बिबटे यांनी सांगितले.

Web Title: Wings do not have the strength to take a high fly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.