हिवाळी अधिवेशनात निनादला ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 07:59 PM2017-12-11T19:59:49+5:302017-12-11T20:03:12+5:30
राज्यातील धनगर समाजाला घटनेनुसार ‘अनुसूचित जमातीच्या’ अनुसूचीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मुख्य मागणीला घेऊन ‘येळकोट-येळकोट जयमल्हार’च्या निनादात धनगर युवक मंडळाचा मोर्चा विधिमंडळावर धडकला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यातील धनगर समाजाला घटनेनुसार ‘अनुसूचित जमातीच्या’ अनुसूचीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मुख्य मागणीला घेऊन ‘येळकोट-येळकोट जयमल्हार’च्या निनादात धनगर युवक मंडळाचा मोर्चा विधिमंडळावर धडकला. कागदाची तयार केलेली पिवळी टोपी, खांद्यावर पिवळा दुपट्टा व हाती पिवळा ध्वज घेऊन मोठ्या संख्येत मोर्चेकरी सहभागी झाले होते. यात युवकांची संख्या लक्ष वेधून घेणारी होती.
यशवंत स्टेडियम येथून निघालेला धनगर बांधवांचा हा मोर्चा मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट चौकात पोलिसांनी अडविला. माजी आमदार हरिदास भदे व मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चाला संबोधित करताना भदे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी व निवडणुकीनंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. उलट ‘टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स’ या संस्थेकडून सर्वेक्षण केले. याला समाजाचा विरोध आहे. अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी करूनच राहणार, असा निर्धारही त्यांनी आपल्या भाषाणातून केला. पोलिसांनी जेव्हा मोर्चाचे शिष्टमंडळांना निवेदन घेऊन सोबत चलण्यास सांगितले, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मोर्चात यावे या मागणीसाठी मार्चेकरी अडून बसले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त करीत मोर्चाचे विसर्जन करण्यात आले. या मोर्चाला आ. प्रकाश शेंडगे, आ. रामराव वळकुटे आदींनी भेटी दिल्या.
मागण्या
अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी करा
सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांचे नाव द्या
धनगरांचा मेंढपाळ चराईचा प्रश्न सोडवा
नोकरीतून बडतर्फ करण्याची कारवाई थांबवा
नेतृत्व
माजी आ. हरिदास भदे, रमेश पाटील