हिवाळी अधिवेशन : 'देवेंद्र फडणवीस पराभव पचवू शकत नाहीत त्यामुळे गोंधळ घातला जातोय'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 03:55 PM2019-12-17T15:55:17+5:302019-12-17T15:55:58+5:30
Maharashtra Winter session : सरकारच्या आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका काढायची सुरु आहे.
नागपूर - पहिलं अधिवेशन असताना सभागृहात गोंधळ निर्माण केला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा पराभव झाला आहे हे मान्य नाही, फडणवीस पराभव पचवू शकत नाही असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
एबीपी माझाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, तुमच्या सरकारच्या काळात महापूर आला, दुष्काळ आला तुम्ही केंद्र सरकारला मदतीची पत्र लिहिली आहे. त्याबाबत दोघांनी मिळून याचा पाठपुरावा करणं गरजेचे आहे. मात्र विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या आसनाजवळ कोणीही फलक झळकावत नाही ही परंपरा आहे. मात्र विरोधी पक्षाने आज ते केलं असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत सरकारच्या आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका काढायची सुरु आहे. भाजपा सरकारच्या काळात सर्वाधिक कर्ज महाराष्ट्रावर झालं. महाराष्ट्राला आर्थिक डबघाईतून बाहेर काढायचं आहे. मात्र निव्वळ राजकारण करुन सभागृहात गोंधळ घातला जातो. वैफल्यग्रस्त विरोधकांना सत्ता आली नसल्याचं शल्य आहे असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी विरोधकांवर केला.
तर आपलं अपयश लपवण्याकरिता केंद्र सरकारचं नाव घेणं हे योग्य नाही. आम्ही आमच्या भरवशावर शेतकऱ्यांना मदत दिली होती. अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला आम्ही राज्याच्या भरवशावर मदत केली आहे. तुमची मागणी होती, तुम्ही किमान समान कार्यक्रम तयार केला. किमान समान कार्यक्रमात अवकाळी शेतकऱ्यांना मदत आणि कर्जमाफीचे मुद्दे ठरवण्यात आले होते. पण शेतकऱ्यांना अद्यापही तुम्ही मदत देऊ शकलेला नाहीत, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता.
मात्र सभागृहात झालेल्या गोंधळावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही भाजपाला लक्ष्य केलं. विरोधकांनी सभागृहात समस्या मांडायच्या असतात, भाजपा नेते आणि विरोधक जी घोषणाबाजी सभागृहात करतायेत, ती केंद्रातल्या सरकारकडे करायला पाहिजे होती. जे लोकं सामना वाचत नाही म्हणत होती, तीच लोकं आज सामना वर्तमानपत्राचे पोस्टर्स घेऊन सभागृहात आली होती. त्यामुळे सामना वाचत नाही, हे केवळ ते दाखवत होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या वाक्याची आठवण करुन दिली.