हिवाळी अधिवेशन : आमदारांना घडवणारे विधिमंडळ ग्रंथालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:07 AM2019-12-10T00:07:17+5:302019-12-10T00:09:01+5:30
आमदारांना त्यातही नवीन आमदारांना एक अभ्यासू आमदार बनविण्यात विधिमंडळ ग्रंथालयाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच विधिमंडळाच्या ग्रंथालयाला आमदार घडवणारे ग्रंथालय असेही म्हटले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे. राज्याच्या विधिमंडळात पारित अनेक कायदे नंतर देशाने स्वीकारले आहेत.विधिमंडळातील व्यापक हिताचे निर्णय घेणारे मंत्री आणि तितकेच अभ्यासू सदस्य असलेल्या आमदारांमुळेच हे शक्य झाले आहे. परंतु या आमदारांना त्यातही नवीन आमदारांना एक अभ्यासू आमदार बनविण्यात विधिमंडळ ग्रंथालयाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच विधिमंडळाच्या ग्रंथालयाला आमदार घडवणारे ग्रंथालय असेही म्हटले जाते.
येत्या १६ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे. दरम्यान आजपासून सचिवालयाचे कामकाजही सुरू झाले आहे. विधिमंडळाचे ग्रंथालयही संशोधकांसाठी सज्ज झाले आहे. ग्रंथालयाचे मुख्य ग्रंथपाल बा.बा. वाघमारे यांनी या ग्रंथालयाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य १९६० पासून अस्तित्वात आले. १९६० पासून सुरू झालेल्या विधिमंडळाची सर्व कागदपत्रे ग्रंथालयात उपलब्ध आहेत. ‘पीएच.डी.’करणाऱ्यांसाठी प्रत्येक संदर्भाची पुस्तके ग्रंथालयात आहेत. विधानसभा व विधान परिषदेच्या कामकाजातील विविध विषयांवर दरवर्षी राज्यातील जवळपास ४० ते ४५ जण ‘पीएच.डी.’ करतात. म्हणजेच पाच वर्षांमध्ये जवळपास २२५ जण ‘राजकारण’ या विषयावरच ’डॉक्टरेट’ होतात. ‘पीएच.डी.’ करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, यवतमाळ, अमरावती, मराठवाडा आदींसह अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. १९५२ पासून अस्तित्वात आलेल्या सर्वोच्च न्यायालयातील विविध प्रकरणांचे व संदर्भसुद्धा उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर देशातील विविध राज्यातील उच्च न्यायालयातील विविध प्रकरणांचेही एकूण १२ लाखांच्या जवळपास कागदपत्रे (संदर्भ) विधिमंडळ ग्रंथालयात उपलब्ध आहेत. ‘पीएच.डी.’ करणाऱ्यांना हवे तेवढे आणि हवे तेव्हा संदर्भ उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याची वेळच कुणावर येत नसल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
संशोधकांना फोनवरही परवानगी
विधिमंडळ ग्रंथालयाचा लाभ आमदारांसह अभ्यासक व ‘पीएच.डी.’ करणाºया विद्यार्थ्यांनाही घेता येतो. नागपूर, विदर्भातीलही अनेक अभ्यासकांना मुंबईमध्ये येऊन याचा लाभ घेणे परवडणारे नसते. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात नागपूरसह विदर्भातील संशोधकांना याचा लाभ घेता येईल. माहितीचे संदर्भ घेणे सोयीचे व्हावे यासाठी नागपूर व विदर्भातील अभ्यासकांना प्राधान्य दिले जाणार आहे. केवळ ‘पीएच.डी.’ करणारेच नव्हे तर संशोधक, विद्यार्थी कुणालाही संदर्भ हवे असल्यास त्यांना फोनवरसुद्धा परवानगी दिली जाईल. त्यांनी ९३२१०२०२७१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही वाघमारे यांनी सांगितले.
९७ आमदार नवीन
२८८ विधानसभा सदस्य संख्याबळ असलेल्या राज्य विधानसभेच्या यंदाच्या निवडणुकीत तब्बल ९७ आमदार हे प्रथमत:च निवडून आले आहेत. यंदा नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराचा तास नसल्याने चर्चेचा कालावधी वाढविण्याची शक्यता आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी तसेच
विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भातील जुन्या संदर्भाची माहिती होण्यासाठी नव्याने सभागृहात येणाºया ९७ आमदारांना या विधिमंडळ ग्रंथालयातील संदर्भाचा फायदा होणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.