हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरपासून नागपुरातच होण्याची शक्यता वाढली; विरोधी पक्षाचा दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 10:51 PM2021-11-13T22:51:34+5:302021-11-13T22:52:04+5:30
Nagpur News विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नियोजित ७ डिसेंबरऐवजी २० डिसेंबरपासून नागपुरात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नियोजित ७ डिसेंबरऐवजी २० डिसेंबरपासून नागपुरात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधिमंडळाशी संबंधित अतिविशिष्ट सूत्रांचे म्हणणे आहे की, आता ठरलेल्या तारखेला अधिवेशन सुरू करणे अतिशय कठीण आहे. जर नागपुरात अधिवेशन झाले तर सोमवार २० डिसेंबर या तारखेवर गंभीरतेने विचार केला जात आहे.
नागपूर करारानुसार नागपुरात अधिवेशन घेण्यासाठी विरोधी पक्षाचा सरकारवर प्रचंड दबाव असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे काही नेत्यांचाही तसाच विचार आहे. अशा परिस्थितीत हिवाळी अधिवेशन नागपुरातच होण्याची शक्यता वाढली आहे, पण, तारीख मात्र नवीन राहील.
अर्थसंकल्पाच्या शेवटच्या दिवशी नागपुरात ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, कोविड संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशन मुंबईतच होईल, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) तयारी थांबवली. निविदा जारी होऊनही वर्क ऑर्डर जारी झाले नाही. नागपुरात अधिवेशन झाले तर दोन महिन्यांची कामे १० ते १५ दिवसात करावी लागणार होती. दुसरीकडे आरोग्य विभागासमोरही अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्वांचे आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे आव्हान होते.
एकूणच प्रशासनाची तयारी पाहता हिवाळी अधिवेशन नागपुरात होण्याची शक्यता जवळपास संपली होती. परंतु विरोधी पक्ष विशेषत: भाजपचा नागपुरातच अधिवेशन घेण्यावर अधिक जोर आहे. विधिमंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, नागपुरात ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू करणे कठीण आहे. अशा परिस्थितीत २० डिसेंबरच्या तारखेवर गंभीरतेने विचार केला जात आहे.
१७ रोजी कॅबिनेट बैठकीनंतर कामकाज सल्लागार समितीची बैठक
हिवाळी अधिवेशनाची तारीख व स्थळ यासंदर्भात अंतिम निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीला घ्यायचा आहे. येत्या बुधवारी १७ नोव्हेंबर रोजी कॅबिनेटची बैठक होईल. बैठकीनंतर लगेच सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. असे सांगितले जाते की, विरोधी पक्षाचे सदस्य या बैठकीत नागपूर कराराचा उल्लेख करीत नागपुरातच अधिवेशन घेण्याबाबत जोर देतील. दुसरीकडे काँग्रेस सोडून सत्तापक्षातील बहुतांश नेत्यांचे मत हे मुंबईतच अधिवेशन घेण्याचे आहे.