Winter Session Maharashtra 2022: तुम्हाला मंत्रीपद हवंय का?; देवेंद्र फडणवीसांची सभागृहातच ठाकरे गटाच्या आमदाराला खुली ऑफर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 05:01 PM2022-12-19T17:01:52+5:302022-12-19T17:03:15+5:30
Winter Session Maharashtra 2022: ठाकरे गटाच्या आमदाराने विचारलेल्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत मंत्रिपदाची ऑफरच देऊन टाकल्याचे म्हटले जात आहे.
Winter Session Maharashtra 2022: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून विरोधकांनी सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर दिले. तसेच अधिवेशन सुरू होण्यापूर्वी शिंदे गटाविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणाबाजी केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या आमदाराला सभागृहातच थेट ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधानसभा सभागृहात ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांच्या बंगल्याला केलेल्या रंगरंगोटीबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. विद्यमान सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नाही आहे. तरीही अधिवेशनात राज्यमंत्र्यांचे सर्व बंगले सजवण्यात आले आहेत. या बंगल्यांची आवश्यकता नसताना ते सजवले गेले आहेत. एका बाजूला सरकार प्रकल्पांवरती करोडो रुपयांचे कर्ज उभे करत आहे. दुसऱ्या बाजूला सरकारी पैशांचा चुराडा होत आहे. हा पैशांचा अपव्यय आहे, अशी टीका सुनील प्रतोद यांनी केली. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
तुम्हाला संधी हवी आहे का?
सुनील प्रभू यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत मंत्रीपदाची ऑफरच देऊन टाकल्याचे म्हटले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला थोडीच माहिती असते, आम्ही कधी मंत्रीमंडळ विस्तार करणार आहे. आम्ही अधिवेशनाच्या काळातही करु शकतो. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तुम्हाला संधी हवी आहे का?, त्यामुळे अधिवेशनाच्या निमित्ताने रंगरंगोटी केली जाते. कोट्यवधी नाहीतर, जेवढे आहेत, त्याचा हिशोब पाठवून देतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी मिश्कीलपणे सांगितले.
दरम्यान, बेळगावात महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशाला मज्जाव करणे व मराठीभाषिकांनी केलेल्या आंदोलनाला दडपण्याचा प्रकार झाल्याचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. या मुद्द्यावर विरोधकांनी महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारबाबत परखड वक्तव्य केले. कर्नाटकात मराठी भाषिकांना संविधानानुसार आंदोलनाचा पूर्ण अधिकार आहे. त्यांचे हे दडपशाहीचे धोरण निषेधार्ह असून तसे त्यांना कळविण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारने लोकशाहीच्या तत्वांचे पालन करावे, असे फडणवीस यांनी म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"