घाम फोडणारी वाहतुकीची कोंडीच अधिवेशनापूर्वीची ‘लिटमस टेस्ट’
By मंगेश व्यवहारे | Published: November 24, 2023 02:36 PM2023-11-24T14:36:49+5:302023-11-24T14:39:38+5:30
गरज नसतानाही दिवसभर वाहतूक पोलिसांची धावपळ : वाहनांच्या लागल्या लांबलचक रांगा : अनेक रस्ते बंद असल्याने वाहनचालकांना मनस्ताप
मंगेश व्यवहारे
नागपूर : अधिवेशन काळात सिव्हिल लाईन्स , सीताबर्डी, धंतोली, रामदासपेठ भागात वाहतुकीची काय परिस्थिती राहील, याचा आढावा ‘लोकमत’कडून घेतला जात आहे. अशातच गुरुवारी शहीद गोवारी स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाने हा अंदाज खरा ठरण्याचे चित्र दिसून आले. या एका कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात वाहतूक व्यवस्था खोळंबली, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, ठिकठिकाणी वाहतुकीची काेंडी झाली. ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना दिवसभर चांगलाच घाम गाळावा लागला. शहीद गोवारी स्मृतिदिनाचा हा कार्यक्रम म्हणजे अधिवेशनापूर्वीची ‘लिटमस टेस्ट’ वाहतूक पोलिसांसाठी अवघड ठरली.
शहीद गोवारी स्मारकावर मोठ्या संख्येने गोवारी बांधव श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत असल्याने पोलिस प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतुकीला निर्बंध घातले जातात. पोलिसांनी सकाळपासूनच गोवारी उड्डाणपूल वाहतुकीस बंद गेला होता. कॉटन मार्केटकडून टेकडी रोडकडे येणारी वाहतूक थांबविली होती. संविधान चौकात बॅरिकेट लावून कामठी रोड व मानकापूर उड्डाणपूलावरील वाहतूक थांबविली होती. टेकडी रोडवरून विद्यापीठाकडे जाणारा रस्त्यावरही बॅरिकेट लावून वाहतूक थांबविली होती. त्यामुळे गुरुवारी सिव्हील लाईन्स, रामदासपेठ, सीताबर्डी, कॉटन मार्केट, धंतोली या परिसरात वाहतुकीची कोंडी झालेली दिसून आली. पोलिसांनी या कार्यक्रमामुळे वाहतूक वेगवेगळ्या मार्गाने वळविली होती. त्यामुळे कार्यालयीन वेळेत वाहने मोठ्या संख्येत रस्त्यावर होती आणि दिवसभरच वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्यावर बघायला मिळाल्या.
या रस्त्यावर लागल्या वाहनांच्या रांगा
१) गोवारी उड्डाणपूल बंद असल्याने वर्धा रोडवरून येणारी वाहतूक रहाटे कॉलनीतून लोकमत चौकाकडून काचीपुरा चौकाकडे वळविण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या रांगा दिसून आल्या.
२) लोकमत चौकातून पंचशील चौक मार्गे वाहने मेहाडिया चौकातून मुंजे चौकाकडे जात असल्याने पंचशील चौक ते मेहाडिया चौक व मेहाडिया चौक ते मुंजे चौकात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
३) कन्नमवार चौक ते मीठानिम दर्गा व फॉरेस्ट ऑफिसजवळून सायन्स कॉलेज चौकापर्यंत वाहनांच्या रांगा होत्या.
४) महाराजबाग चौकात सायन्स कॉलेजकडून येणाऱ्या वाहतूकीमुळे वाहनांचा रांगा लागल्या होत्या. व्हेरायटी चौक ते महाराजबाग चौक दरम्यानही वाहनांच्या रांगा बघायला मिळाल्या.
५) विद्यापीठ लायब्ररी चौक ते झाशी राणी चौक दरम्यानही वाहनांची लांबच लांब रांग दिसून आली.
६) वनामती ते अलंकार टॉकीज चौक व अलंकार टॉकीज चौक ते काचीपुरा चौकदरम्यान वाहनांची कोंडी झाली होती. सेंट्रल मॉलसमोर दिवसभर वाहतूक पोलिस कोंडी साडवित होते.
७) संत्रा मार्केट ते कॉटन मार्केटदरम्यानही वाहनांच्या रांगा दिसून आल्या.
८) विजय टॉकीज चौकातून मुंजे चौकदरम्यान ही वाहतुकीची कोंडी दिसून आली.
९) दुपारच्या सुमारास सिव्हील लाईन्सच्या भवन्स शाळे समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांची कोंडी झाली होती.
१०) सायंकाळी जीपीओ चौक ते आरबीआय चौक आणि पुढे किंग्जवे चौकादरम्यान वाहतुकीची कोंडी झाली होती.
- तर अधिवेशन काळात काय होईल?
मानकापूर उड्डाणपूल व कामठी रोडकडून येणारी वाहतूक पोलीसांनी आरबीआय चौकातून उजवे वळण घेऊन कन्नमवार चौक, आकाशवाणी चौकपासून महाराज बाग चौकाकडे वळविली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा रस्त्यावर लागल्या होत्या. जाम सारखी परिस्थिती झाली नाही. मात्र, अधिवेशन काळात आरबीआय चौकातून उजव्या वळणाचा मार्ग बंद केलेला असतो. सायन्स कॉलेजपासून झिरो माईलचा रस्ता बंद असतो. आकाशवाणी चौकातून आरबीआयकडे व जायका मोटर्सकडूनही मार्ग बंद असतो. अन्न पुरवठा कार्यालयाकडील मार्गावरही कठडे असतात. वर्धा रोडवरील उड्डाणपूल बंद असतो. आता पुल तुटल्याने खालचा मार्गही पंचशील चौकापासूनच बंद झाला आहे. दुसरीकडे विद्यापीठ लायब्ररीजवळचा पुलाचे काम सुरू असल्याने रस्ता बंद आहे. अधिवेशन काळात वाहतुकीचे हे मार्ग बंद असल्याने वाहतुकीची पुरती वाट लागण्याची शक्यता आहे.