चारही दिशेला सुरू बांधकाम, कसे होणार नाही ट्रॅफिक जाम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 11:03 AM2023-11-25T11:03:51+5:302023-11-25T11:06:51+5:30
अधिवेशन तोंडावर शहरात वाहतुकीचा खोळंबा : डझनभर काम वाहतुकीला कसा लागणार लगाम?
मंगेश व्यवहारे, वसीम कुरैशी
नागपूर : अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकमत शहरातील वाहतुकीचा आढावा सातत्याने घेत आहे. गुरुवारी एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनामुळे अधिवेशनापूर्वीची वाहतुकीची लिटमस टेस्ट वाहतूक पोलिसांना करावी लागली. या टेस्टनेच पोलिसांना घाम फोडला. अधिवेशन काळात तर राज्यभरातून लोकं नागपुरात येतात, वाहनांच्या संख्येत वाढ होते. मंत्र्यांचे कॉनव्हाय ये-जा करतात. आमदार आणि अधिकाऱ्यांचा लवाजमा असतो. या पाहुण्यांसाठी शहरातील वाहतूक व्यवस्था टार्गेटवर असते. यंदा अधिवेशन काळात केवळ विधानभवनाचा परिसरच नाही, तर शहरभर वाहतुकीचा जाम लागण्याची भीती आहे. कारण डझनभरावर बांधकामे शहरात आणि शहराच्या आऊटरला सुरू आहेत. अशात अधिवेशनासाठी रस्ते बंद केल्यास नागपूरकरांच्या चांगल्याच जिव्हारी लागणार आहे.
राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतले जाते. दरवर्षी या काळात होत असलेल्या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे नागपूरकर वैतागतात, पण यंदा नागपूरकरांच्या वैतागाचा उद्रेक होणार असल्याचे चित्र दिसतेय. कारण अधिवेशनात राज्यभरातून येणारे पाहुणे, आमदार, अधिकारी व मंत्र्यांच्या लवाजमा यामुळे वाहनांची संख्या तर वाढेल. त्यातच मोर्चा घेऊन राज्यभरातून विविध संघटना नागपुरात येतील. त्या काळात लाखो लोकं विधानभवन आणि परिसरात असतील. सोबतच त्यांची वाहनेही असतील. मंत्र्यांसाठी, मोर्चांसाठी शहरातील रस्ते ब्लॉक करण्यात येतील. पंचशील चौकातील एक पूल तुटल्यामुळे रस्ता बंद केल्याने धंतोली, रामदासपेठ, सीताबर्डी, सिव्हिल लाईनसारख्या परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे.
अधिवेशन काळात गोवारी पूलही वाहतुकीसाठी बंद असल्याने ही कोंडी आणखी वाढणार आहे. अधिवेशनाच्या काळात हाच भाग नाही, तर शहरभर वाहतुकीच्या जाम लागण्याची चिन्ह आहेत. कारण शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर रस्त्यांचे सिमेंटीकरण, उड्डाणपूल, रेल्वेचे ब्रिज, पडलेल्या पुलांचे बांधकाम सुरू असल्याने रस्ते निमुळते झाले आहेत. एखादे अवजड वाहन त्यात फसले की रस्ताच ब्लॉक होतो, अशी परिस्थिती आहे.
शहरातील चारही दिशेने बांधकाम सुरू आहे. अमरावती रोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे आरटीओपर्यंत रस्ता अरुंद झाला आहे. कामठी रोडवर एलआयसी ते ऑटोमोटिव्ह चौक उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण व्हायचे आहे. भंडारा रोडवरील पारडीचा उड्डाणपुलाचे काम अजूनही रखडले आहे. वर्धा रोडवर चिंचभवनजवळ जुना आरओबीचे बांधकाम सुरू आहे. सेंट्रल एव्हेन्यू रोडवर इंदोरा ते दिघोरी सर्वांत लांब उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी अग्रेसन चौक, महाल भागात वाहतुकीसाठी रस्ते अरुंद झाले आहेत. उमरेड रोडवरून येणाऱ्या वाहतुकीला भांडेप्लॉट चौक ते ताजाबाद दरम्यान सुरू असलेल्या कामामुळे अडथळा निर्माण झाला आहे. तिकडे दिघोरी चौकाच्या पुढेही बांधकाम सुरूच आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. अधिवेशनात ही कोंडी आणखी वाढणार असून, नागपूरकरांच्या संतापाचा उद्रेक होणार आहे.
शहरात सुरू असलेली बांधकामे आणि काम करणाऱ्या एजन्सी
- पारडी पूल - एनएचएआय
- अमरावती रोडवरील उड्डाणपूल - पीडब्ल्यूडी एनएच डिव्हिजन
- वर्धा रोडवरील चिंचभवन जुना आरओबी - रेल्वे
- एलआयसी ते ऑटोमोटिव्ह चौक - महामेट्रो
- कावरापेठ उड्डाणपूल - पीडब्ल्यूडी एनएच डिव्हिजन
- अजनी आरओबी - एमआरआयडीसी (महारेल)
- इंदोरा ते दिघोरी - एनएचएआय
- गणेश टेकडी रस्ता रुंदीकरण - महामेट्रो
- कडबी चौक ते मोमीनपुरा - एमआरआयडीसी
- विद्यापीठ लायब्ररीजवळील पडलेल्या पुलाचे बांधकाम - नागपूर महापालिका
- रिंगरोडवरील छत्रपती चौकातील रेल्वे पूल-रेल्वे
- सूर्यनगर आरयूबी - एनएचएआय
- आऊटर रिंग रोड कॅन्सर हॉस्पिटल आरओबी - एनएचएआय
- सीएमपीडीआय ते मेकोसाबाग उड्डाणपुलाचे काम अपूर्ण - पीडब्ल्यूडी एनएच डिव्हिजन
- गोधनी ते बोखारा आरओबी - एमआरआयडीसी
- पंचशील चौक पूल- एनएचएआय
- महाराजबाग चौक ते व्हीसीए काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.
- यशवंत स्टेडियम ते मुंजे चौक रस्त्याचे सिमेंटीकरणाचे काम
- वाहतुकीच्या कोंडीला ही कारणेदेखील महत्त्वाची
१) काही उड्डाणपुलाच्या युटीलिटी शिफ्टिंगचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
२) शहरात कारची संख्या वाढली आहे.
३) रस्त्यावर मनमानी पार्किंग, एक कार सहा दुचाकीची जागा घेते.
४) सिव्हिल लाईन्स परिसरात सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी.
५) आपली बस, हजारच्या जवळपास ट्रॅव्हल्स, ऑटोचालक, ई-रिक्षावाल्यांची वाढलेली संख्या.
- शुक्रवारीही झाली कोंडी
गुरुनानक जयंतीनिमित्त शहरातून शीख बांधवांची रॅली काढण्यात आली. त्यासाठी लोकमत चौकातून बजाजनगरकडे जाणारा रस्ता सकाळपासूनच बंद केला होता. सायंकाळी रॅली निघाल्याने वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली. बजाजनगर, धंतोली, रामदासपेठ, काँग्रेसनगर या भागांतील मुख्य रस्ते आणि गल्ल्यांमध्ये जाम लागले.