राजकीय प्रश्न विचाराल, तर उत्तर राजकीयच मिळेल; मुख्यमंत्री फडणवीस यांची रोखठोक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 06:33 IST2024-12-17T06:32:54+5:302024-12-17T06:33:01+5:30
काँग्रेसने ईव्हीएमवर दोष देण्यापेक्षा पराभवावर आत्मचिंतन करावे. ज्या राज्यात काँग्रेस निवडून आली, तेथे ईव्हीएम दोषी आढळले नाही का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राजकीय प्रश्न विचाराल, तर उत्तर राजकीयच मिळेल; मुख्यमंत्री फडणवीस यांची रोखठोक भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : विरोधी पक्ष राजकीय दृष्टीने प्रश्न विचारणार असतील, तर त्यांना राजकीयच उत्तर मिळेल, विरोधी पक्ष नेत्यांचे आव्हान स्वीकारून मी त्यांना सभागृहात सर्व प्रश्नांवर उत्तर द्यायला तयार आहे, अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांकडे मांडली.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारने आमच्या प्रश्नाला उत्तर द्यावे, असे आव्हान दिले आहे, असा प्रश्न केला असता ते म्हणाले, विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला सरकार तयार आहे, फक्त त्यांनी राजकीय प्रश्न विचारू नये, विचारल्यास त्यांना राजकीय उत्तर दिले जाईल. हे सरकार ओबीसी लोकांना वापरून फेकून देते, या नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री म्हणाले, ओबीसींकरिता आम्ही जे केले, ते काँग्रेसने कधीच केले नाही. काँग्रेसने वापरून फेकण्याचे राजकारण केले. महायुतीच्या कार्यकाळात २९ अध्यादेश काढण्यात आले. ५२ हॉस्टेल तयार करण्यात आले, नरेंद्र मोदी यांनी तर ओबीसींसाठी अनेक योजना राबविल्या आहेत.
मुनगंटीवार यांना मोठी जबाबदारी देणार
मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश न झाल्यासंदर्भात फडणवीस म्हणाले, यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे, पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसने पराभवावर आत्मचिंतन करावे
काँग्रेसच्या ईव्हीएमविरोधातील मोर्चाबाबत फडणवीस म्हणाले, काँग्रेसने ईव्हीएमवर दोष देण्यापेक्षा पराभवावर आत्मचिंतन करावे. ज्या राज्यात काँग्रेस निवडून आली, तेथे ईव्हीएम दोषी आढळले नाही का? असा सवाल फडणवीस यांनी केला.