कालपर्यंत माझे नाव होते, ते का नाही आले माहिती नाही; मुनगंटीवार यांनी व्यक्त केली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 06:25 IST2024-12-17T06:24:33+5:302024-12-17T06:25:01+5:30
कालपासून मी याच विचारात आहे की मला मंत्रिपद न देण्याचे कारण काय? ते समजले तर मलाही दुरुस्त करता येईल, अशी भावना मंत्रिपदाची संधी न मिळू शकलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

कालपर्यंत माझे नाव होते, ते का नाही आले माहिती नाही; मुनगंटीवार यांनी व्यक्त केली व्यथा
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : कालपर्यंत माझे नाव होते ते वेळेवर का आले नाही हे मला माहिती नाही. माझे नाव मंत्रिपदासाठी पाठविले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला सांगितले होते. नंतर काय झाले ते एकदा कळायला हवे, अशी भावना मंत्रिपदाची संधी न मिळू शकलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात किशोर जोरगेवार यांना तिकिट मिळू नये म्हणून आपण प्रयत्न केले होते, त्यासाठी आपण दिल्लीलाही गेलो. आपल्या समर्थकाने तेथे बंडखोरी केली या घटनाक्रमामुळे आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही असे वाटते काय, या प्रश्नात मुनगंटीवार म्हणाले की, पक्ष इतका संकुचित कधीही नसतो. ज्यांचा मुलगा दुसऱ्या मतदारसंघात भाजपच्या विरोधात लढला, त्यांना (गणेश नाईक) मंत्रिपद मिळू शकते तर चंद्रपूरच्या मुद्यावरून पक्ष माझ्यावर राग कसा काढेल? गोरगरीब जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडणे हीच आपली पुढची दिशा असेल. याच काय पण पुढच्या जन्मातही भाजप सुटणार नाही असे ते म्हणाले. पक्ष कदाचित मला दुसरी जबाबदारी देण्याचा विचार करत असेल.
गटनेतेपदी निवड झाली त्याच दिवशी श्रद्धा व सबुरी राखण्याचा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होताच, मी देखील वाट पाहीन असे मुनगंटीवार म्हणाले. मुनगंटीवार सोमवारी विधानसभेत आले नाहीत, यावर ते म्हणाले की आज विधानसभेत फारसे कामकाज नव्हते. मी आलो असतो तरी मला नको ते प्रश्न तुम्ही विचारले असते.
कालपासून मी याच विचारात आहे की मला मंत्रिपद न देण्याचे कारण काय? ते समजले तर मलाही दुरुस्त करता येईल. पावलापावलावर मनाविरुद्ध घडत असते तरीही तो काम पुढे नेतो तो खरा कार्यकर्ता असे आमचे नेते प्रमोद महाजन म्हणायचे. त्यानुसार काम करेन. - सुधीर मुनगंटीवार