मुंबई महापालिकेचे २५ वर्षांचे होणार ऑडिट; तीन सदस्यांची समिती स्थापन

By दीपक भातुसे | Published: December 13, 2023 05:22 AM2023-12-13T05:22:10+5:302023-12-13T05:22:42+5:30

मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षांच्या कारभाराचे ऑडिट करण्याची तसेच श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा महायुती सरकारने सोमवारी मध्यरात्री विधानसभेत केली.

Winter Session Maharashtra 25-year audit of Mumbai Municipal Corporation Constituent committee of three members | मुंबई महापालिकेचे २५ वर्षांचे होणार ऑडिट; तीन सदस्यांची समिती स्थापन

मुंबई महापालिकेचे २५ वर्षांचे होणार ऑडिट; तीन सदस्यांची समिती स्थापन

दीपक भातुसे

नागपूर : मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षांच्या कारभाराचे ऑडिट करण्याची तसेच श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा महायुती सरकारने सोमवारी मध्यरात्री विधानसभेत केली. ही घोषणा करून मागील २५ वर्षे मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला (ठाकरे गट) अडचणीत आणण्याची व्यूहरचना सरकारने आखली आहे. हे ऑडिट करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करीत असल्याची घोषणा उद्योगमंत्री आणि प्रभारी नगरविकासमंत्री उदय सामंत यांनी केली.

या समितीमध्ये नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि अर्थविभागाचे (ऑडिट) संचालक यांचा समावेश आहे. भाजप आमदार योगेश सागर यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना मुंबई महापालिकेतील कारभाराचे ऑडिट करण्याची मागणी केली होती. त्याला सामंत यांनी सोमवारी रात्री उशिरा उत्तर दिले.

कॅगनेही ओढले होते ताशेरे

 शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर शिवसेनेची २५ वर्षे सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचे ऑडिट करण्याची मागणी

भाजपकडून होत आहे.

 महापालिकेत २५ वर्षांत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून वारंवार केला गेला. मुंबई महानगरपालिकेत ८ नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान झालेल्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून करण्यात आली आहे.

 मुंबई महापालिकेत पारदर्शकतेचा अभाव, निधीचा निष्काळजीपणे वापर आणि ढिसाळ नियोजन असल्याचे ताशेरे कॅगने अहवालात ओढलेे होते.

 तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा फक्त ट्रेलर असल्याचे सांगत ‘खरा पिक्चर’ बाकी असल्याचे म्हटले होते.

सत्तेच्या चाव्यांसाठी संघर्ष

 मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला शह देण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी ऑडिट करण्याची घोषणा करण्यात आल्याची चर्चा आहे.

 मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प तब्बल ५२ हजार कोटी रुपयांचा आहे. आर्थिकदृष्ट्या देशात सक्षम असलेल्या मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हातात राहाव्यात, यासाठी यापुढे सत्ताधारी आणि ठाकरे गटात आणखी संघर्ष पाहायला मिळणार आहे.

हा ऑडिट अहवाल पुढील अधिवेशनात सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती कशी आहे, महापालिकेत व्यवहार कशा पद्धतीने झाले, यासंदर्भातील चौकशी करून त्याचा अहवाल तयार केला जाईल.

- उदय सामंत, उद्योगमंत्री

आमची काहीच हरकत नाही. मुंबई महापालिकेच्या २५ वर्षांच्या पूर्ण कारभाराची तपासणी करा. यात शिवसेना - भाजप मागची पाच वर्षे सोडली तर दोघे एकत्र सत्तेत होते, जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना शिक्षा करा. मुंबईप्रमाणे नागपूर, पुणे, ठाणे महापालिकांचीही चौकशी करा.

- अनिल परब, शिवसेना (ठाकरे गट)

Web Title: Winter Session Maharashtra 25-year audit of Mumbai Municipal Corporation Constituent committee of three members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.