'ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच ...'; विधिमंडळ परिसरात रंगला आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा
By मंगेश व्यवहारे | Published: December 12, 2023 06:33 AM2023-12-12T06:33:46+5:302023-12-12T06:34:05+5:30
ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच बघितला : ठाकरे
मंगेश व्यवहारे
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे सभागृहात आले आणि पहिल्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या कार्यप्रणालीवर टीका केली. लोकांच्या घरादारावरती नांगर अन् समुद्रावर ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच पाहिला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले. उद्धव ठाकरेंबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तो ट्रॅक्टर कशाचा होता, याची माहिती त्यांनी घ्यायला हवी होती. तो बिच कॉम्बर होता. बिच कॉम्बरमध्ये असलेल्या जाळीत समुद्राच्या काठावरील सर्व कचरा संकलित होतो आणि त्याचे विघटन होते, पण दुर्दैव आहे बोलणाऱ्यांनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती. ज्यांनी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालविला त्यांना हे काय कळणार? अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
उद्धव ठाकरेंना माझी अडचण होतेय, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी दिल्लीला, तेलंगणाला गेलो, गावी गेलो वा बिचवर स्वच्छता करायला गेलो, तरी यांना अडचण आहे. महाराष्ट्राला घरी बसणारा मुख्यमंत्री पाहिजे की, दिल्ली ते गल्ली फिल्डवर काम करणारा मुख्यमंत्री हवा, याचा विचार करायला हवा. मी फिल्डवर काम करणारा मुख्यमंत्री आहे. फेसबुक लाइव्हवर काम करत नाही.
मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली
अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढला आहे. बँकांकडून कर्जाचा तगादा लावला जात आहे. आज त्यांचा कुणीही वाली नाही. शेतकरी आपले अवयव विकायला तयार झाले आहेत. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही शेतकऱ्यांवर आली नव्हती. मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती. या सरकारला कळवळा असेल, तर पंचनाम्याचे थोतांड बंद करून कर्जमाफी द्यावी, अशी रोखठोक मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
आम्ही शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत केली
शिंदे म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर आहे. जेव्हा-जेव्हा संकट आले, तेव्हा-तेव्हा सरकार शेतकऱ्याच्या मदतीसाठी उभे राहिले. आतापर्यंत शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. मी आणि फडणवीस स्वत: बांधावर गेलो आणि नुकसानीची पाहणी केली. जे बोलत आहेत ते चार दिवसांनंतर अधिवेशनात आले, ते किती गंभीर आहेत, याचा विचार त्यांनीच करावा.
पटेलांना पण तोच न्याय लावणार का?
भाजपने नवाब मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आम्ही आदर करतो, पण नवाब मलिकांना जो न्याय लावला, तो प्रफुल्ल पटेलांना लावून तुम्ही त्यांच्यापासून अंतर ठेवणार का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
याकुबच्या कबरीचे उदात्तीकरण काेणी केले?
ज्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्यांना मंत्रिमंडळात ठेवले, तसेच याकुब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण केले, त्यांना आता बोलण्याचा अधिकार नाही असा टाेला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला