आम्ही मराठा समाजाप्रमाणे आंदोलन केले तर आम्हाला गोळ्या घालून मारतील: अबू आझमी
By मंगेश व्यवहारे | Published: December 20, 2023 12:15 PM2023-12-20T12:15:50+5:302023-12-20T12:16:56+5:30
"मुस्लिम समाजाला शिक्षण क्षेत्रात पाच टक्के आरक्षण देण्याबाबत पुरोगामी पक्षांसह कुणीही एक शब्द उच्चारत नाही"
Winter Session Maharashtra ( Marathi News ) नागपूर : मुस्लिम समाजाला शिक्षण क्षेत्रात पाच टक्के आरक्षण देण्याबाबत पुरोगामी पक्षांसह कुणीही एक शब्द उच्चारत नाही. आम्ही मराठा समाजाप्रमाणे आंदोलन केले तर आम्हाला गोळ्या घालून मारतील, कित्येकांना कारागृहात टाकतील, अशी टीका समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केली.
हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी आझमी यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात माहिती दिली. या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलविले जाईल, असेही सांगितले. मात्र, हे करीत असताना मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याबाबत कुणीही विचार करीत नाही. पुरोगामी म्हणवणारे पक्षदेखील याबाबत चकार शब्द काढीत नाहीत.
आम्ही वारंवार मागणी करूनही सभागृहात या विषयावर बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला वेळ दिला नाही, असेही आझमी यावेळी बोलताना सांगितले. त्यांच्यासह समाजवादी पक्षाचे आमदार रइस शेखदेखील उपस्थित होते.