जयंत पाटील म्हणाले, हे ट्रिपल इंजिन नव्हे, तर ट्रबल सरकार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 06:22 AM2023-12-12T06:22:41+5:302023-12-12T06:24:05+5:30
राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार अधिक वेगाने चालेल अशी अपेक्षा होती, पण ट्रिपल इंजिनमुळे ट्रबल वाढले आहेत.
राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार अधिक वेगाने चालेल अशी अपेक्षा होती, पण ट्रिपल इंजिनमुळे ट्रबल वाढले आहेत. तिसरे इंजिन जोडल्यानंतर या सरकारमध्ये अडचणी वाढल्याचे सरकारकडे पाहिल्यावर दिसतेय, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान बोलताना केली.
राज्यात तीव्र दुष्काळ असताना अर्धवट दुष्काळ जाहीर केला. सरकारचे मंत्री इतर राज्यांत प्रचारात गुंतले होते, इथे आपला संसार फाटायला निघाला आहे आणि आपले मंत्री दुसऱ्या राज्याचा संसार थाटायला गेले, अशी बोचरी टीका पाटील यांनी यावेळी बोलताना केली. आधी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले, आता तर निर्यातीवर बंदी आणली, टाटा-बिर्लांच्या उत्पादनांच्या निर्यातीवर कधी बंद आणत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला वाढू द्यायचे नाही हे या सरकारचे धोरण आहे.
अवकाळी पावसाने लाखो हेक्टरवरच्या शेतीचे नुकसान झाले. तरी सरकार अजून पूर्णपणे ग्राऊंडवर उतरले नाही. सरकारने आतापर्यंत पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करून मदत वाटायला सुरुवात करायला हवी होती, पण राज्य सरकारकडे अजून आकडेवारीच नाही म्हणून कुणाला किती मदत द्यायची हे सरकारला कळत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.