गोगावले सुरतेला कोणाचे नाक कापायला गेले?; अंबादास दानवे यांचा सवाल
By मंगेश व्यवहारे | Published: December 13, 2023 10:59 AM2023-12-13T10:59:57+5:302023-12-13T11:00:25+5:30
मोर्चेकऱ्यांना सामोरे जाण्यासाठी या सरकारला वेळ नाही. यांचा सगळा वेळ टक्केवारी,बदल्या आणि भ्रष्टाचारात जातो असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला.
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाचे नाक कापायला सुरतेला गेले होते. गोगावले आणि इतर लोक नेमके कुणाचे नाक कापण्यासाठी तेथे गेले होते, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. शिवाजी महाराज अत्यंत रुबाबात सुरतेला गेले होते आणि हे सगळे लोक ज्यांनी यांना मोठे केले त्यांच्याशीच गद्दारी करुन गेले. याआधी त्यांनी शिवसेनाप्रमुखांचा अपमान केला होता आणि आता शिवाजी महाराजांही अपमान केला आहे. शिवाजी महाराजांमबरोबर तुलना करण्याएवढे गोगावले मोठे झाले का?, असेही दानवे म्हणाले.
मोर्चेकऱ्यांना सामोरे जाण्यासाठी या सरकारला वेळ नाही. यांचा सगळा वेळ टक्केवारी,बदल्या आणि भ्रष्टाचारात जातो. शिंदे गटाच्या आमदारांनी कमळाच्या चिन्हावर लढण्याची इच्छा व्यक्त केली असल्याच्या मुद्द्यावर बोलताना दानवे यांनी या आमदारांना यापुढे कमळाच्या चिन्हावरच लढावे लागणार आहे, असे सांगितले. निवडणूक आयोग पक्षपाती आहे. या देशात सध्या एकाधिकारशाही आहेच. येत्या काळात हुकुमशाही आणि संरजामशाही येणार असल्याची सगळी चिन्हे आहेत. अजित पवारांनी पीएचडीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांची थट्टा करू नये, अशीही टीका दानवे यांनी यावेळी बोलताना केली.