सरकारचा नंदीबैल म्हणतो, नाही नाही; विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्य सरकारचा निषेध केला
By मंगेश व्यवहारे | Published: December 20, 2023 11:30 AM2023-12-20T11:30:22+5:302023-12-20T11:33:15+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या काळात एकाही घटकाचा प्रश्न सुटला नसल्याची टीका करीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारचा निषेध केला.
Winter Session Maharashtra ( Marathi News ): नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या काळात एकाही घटकाचा प्रश्न सुटला नसल्याची टीका करीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारचा निषेध केला. हाताला काळ्या पट्ट्या बांधून यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात, रोहित पवार, वैभव नाईक, राजन साळवी, रवींद्र धनगेकर यांच्यासह इतर आमदार या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. ‘
हिवाळी अधिवेशनाच्या काळात जनतेचे कोणतेच प्रश्न राज्य सरकारला सोडविता आले नाहीत. शेतकऱ्यांना मदत मिळाली का, पेपरफुटीवर कडक कायदा झाला का, परीक्षा फी कमी झाली का, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सुटले का, आशा सेविकांचे प्रश्न सुटले का, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय दिला का, कर्मचारी भरती सुरू झाली या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असेच असल्याची टीका या विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली. ‘प्रश्न कोणताही विचारा, या सरकारचा नंदीबैल म्हणतो नाही, नाही’, ‘ खासदार निलंबनाचा निषेध असो’, ‘ राज्य सरकारचा धिक्कार असो’, अशा वेगवेगळ्या घोषणा देऊन विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्य सरकारचा निषेध केला.