मोदी सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय- नाना पटोले
By मंगेश व्यवहारे | Published: December 20, 2023 01:07 PM2023-12-20T13:07:57+5:302023-12-20T13:08:23+5:30
विरोधकांनी कोणताही प्रश्न उपस्थित केला तर त्यांना विधानभवन आणि परिषदेत आपले म्हणणे देखील मांडू दिले जात नाही असा आरोप त्यांनी केला.
नागपूर : वेलमध्येही न उतरता जागेवर उभे राहून प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना निलंबित करीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे, असा आरोप करीत कॉँग्रसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद् सरकारवर टीकेची झोड उठविली.
विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, एकतर्फी निर्णय घेऊन केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करीत आहे. अशा रितीने देशाच्या इतिहासात प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना कधीही निलंबित करण्यात आलेले नाही. ही लोकशाहीची नुसती थट्टा नसून तिचा खून केल्यासारखे आहे. राज्यातही याहून वेगळे चित्र नाही. विरोधकांचा आवाज दाबण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केंद्र आणि भाजापा सरकार करीत आहे. विरोधकांनी कोणताही प्रश्न उपस्थित केला तर त्यांना विधानभवन आणि परिषदेत आपले म्हणणे देखील मांडू दिले जात नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कृतीचा आणि निषेध करतो, असेही नाना पटोले म्हणाले.