नागपुरातील हिवाळी अधिवेशन रद्द करावे : विकास ठाकरे यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:33 AM2020-09-19T00:33:03+5:302020-09-19T00:34:22+5:30
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता हे अधिवेशन रद्द करण्याची मागणी पुढे आली आहे. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हिवाळी अधिवेशन रद्द करण्याची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता हे अधिवेशन रद्द करण्याची मागणी पुढे आली आहे. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हिवाळी अधिवेशन रद्द करण्याची मागणी केली आहे.
आ. ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, नागपुरातील हिवाळी अधिवेशनावर ७५ कोटी रुपयांपेक्षाही अधिक खर्च होतो. हा निधी विदर्भातील आरोग्य सेवा सशक्त करण्यावर खर्च व्हायला हवा. त्यांनी म्हटले की, हिवाळी अधिवेशनामुळे आमदार निवासातील कोविड केअर सेंटर व रविभवनातील कोविड टेस्टिंग सेंटर व डॉक्टर्स, परिचारिकांच्या निवासाची व्यवस्था संकटात आली आहे. इतकेच नव्हे तर १६० खोल्यांच्या गाळ्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही जागा रिकामी करण्याचे निर्देश बजावण्यात आले आहेत. आता ही मंडळी कोरोना संकटाच्या काळात दुसरीकडे कसे जातील. हा प्रश्न निर्माण जाला आहे. दुसरीकडे शहरातील मानकापूर येथे जम्बो सेंटर बनवण्यात येणार आहे. शहरातील आरोग्य सुविधा कोलमडून पडली आहे. एकीकडे शहरात आॅक्सिजन मिळत नसल्याने रुग्ण मरत आहेत. तर दुसरीकडे अधिवेशनासाठी इमारतींच्या रंगरंगोटीवर मोठा खर्च केला जाईल. तेव्हा हिवाळी अधिवेशनावर खर्च होणारा हा निधी येथील आरोग्य सेवा सशक्त करण्यावर खर्च व्हायला हवा.