नागपूर हिवाळी अधिवेशनात विधिमंडळावर धडकणार एकूण तब्बल ७० मोर्चे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 09:54 AM2017-12-11T09:54:57+5:302017-12-11T09:56:26+5:30
सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी ७० मोर्चे धडकणार आहेत.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी ७० मोर्चे धडकणार आहेत. यात धनगर युवक, अंगणवाडी कर्मचारी, कोतवाल संघटना, विकलांग संघर्ष समिती, क्षयरोग नियंत्रण कर्मचारी, महानुभाव महामंडळ, आदिम कृती समिती, पोलीस पाटील, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समिती, आॅटोरिक्षा चालक, संविधान सुरक्षा सेना, परिट सेवा मंडळ यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या मोर्चातून हल्लाबोल करणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मोर्चांची संख्या वाढली आहे. यामुळे हे अधिवेशन मोर्चांच्या मागण्यांना घेऊन गाजणार असल्याचे चित्र आहे.
शहराच्या चारही भागातून येणाऱ्या मोर्चांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. नागपुरात सुरू असलेल्या मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांच्या कामांचा मोर्चा व वाहतूक व्यवस्थेला फटका बसू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली आहे. सुरक्षेसाठी अडीच हजार पोलिसांची अतिरिक्त कुमक नागपुरात दाखल झाली आहे. मोर्चेकरांवर लक्ष ठेवण्यासाठी २२६ सीसीटीव्ही तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ड्रोन कॅमेरे, हेल्मेट कॅमेऱ्यांची नजर मोर्चेकऱ्यांवर असणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी ‘लोकमत’ला दिली.