दोन आठवड्यांचे राहणार नागपुरातील हिवाळी अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 07:06 PM2020-10-09T19:06:27+5:302020-10-09T19:09:44+5:30
Vidhansabha winter session in Nagpur कोरोनाच्या संकटातच नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. ७ डिसेंबरपासून सुरू होत असलेले हे अधिवेशन दोन आठवड्यांपर्यंत चालेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संकटातच नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. ७ डिसेंबरपासून सुरू होत असलेले हे अधिवेशन दोन आठवड्यांपर्यंत चालेल.
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काँग्रेसने नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शविला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही १५ नोव्हेंबर रोजी परिस्थितीचा आढावा घेऊनच अधिवेशन घेण्याबाबतचा निर्णय घ्यावा असे म्हटले होते. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत: नागपुरात हिवाळी अधिवेशन ठरल्यानुसार होईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, नागपुरात अधिवेशनाची तयारी सुरु झाली आहे. आता ७ ते १८ डिसेंबर असा दोन आठवड्याचा कार्यक्रमही आलेला आहे. विधिमंडळातील सूत्रांनुसार १६ डिसेंबर रोजी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी पुढे वाढवण्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. अधिवेशन कालावधी दरम्यान कोरोना संदर्भातील नियम काटेकोरपणे पाळण्यात येणार असल्याचा दाावाही केला जात आहे.
प्रश्नोत्तरेही होणार
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यात आला होता. राज्यातील विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनही दोन दिवसात आटोपण्यात आले. त्यामुळे हिवाळी अधिवेशन पूर्वीप्रमाणेच घेण्याचा प्रयत्न आहे. यात प्रश्नोत्तराचा तासही करण्याची तयारी केली जात आहे. विधिमंडळ सचिवालयाने आमदारांना ई-मेल करून आपापले प्रश्न १९ ऑक्टोबरपर्यंत पाठवण्यास सांगण्यात आले आहे. १० नोव्हेंबर रोजी लॉटरी पद्धतीने प्रश्नांची निवड केली जाईल.