...और वो आईना साफ करता रहा; ईव्हीएमवर खापर फोडणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 06:46 IST2024-12-20T06:44:09+5:302024-12-20T06:46:02+5:30
मी आधुनिक अभिमन्यू आहे. माझ्यासाठीही चक्रव्यूह रचण्यात आला. पण, तो भेदून मी उभा आहे. 'आंधीयो में भी जो जलता हुआ मिल जायेगा, उस दिये से पुछना, मेरा पता मिल जायेंगा... असा शेर म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत सहन केलेल्या वेदनेला वाट मोकळी करून दिली.

...और वो आईना साफ करता रहा; ईव्हीएमवर खापर फोडणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर खापर फोडणे सुरू केले आहे. आम्ही लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात हरताच आत्मपरीक्षण केले. फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिले. आता तुम्हीही खुल्या मनाने जनादेश स्वीकारा. मतदारांचा अपमान करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत विरोधकांना फटकारले. 'गालिब ताउम्र ये भूल करता रहा, धुल चेहरे पर थी और वो आईना साफ करता रहा...' असे सांगत त्यांनी विरोधकांना आधी स्वतःच्या चुकांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला गुरुवारी विधानसभेत उत्तर देताना फडणवीस यांनी राज्यातील अभूतपूर्व यशाचे श्रेय पक्षाचे नेते, सहकारी व जनतेला दिले. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत मला व माझ्या कुटुंबीयांना सतत टार्गेट करण्यात आले. पण, मी त्यांचे आभार मानतो. कारण, त्यांनी वातावरण खराब केले व त्यामुळे माझ्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. मी आधुनिक अभिमन्यू आहे. माझ्यासाठीही चक्रव्यूह रचण्यात आला. पण, तो भेदून मी उभा आहे. 'आंधीयो में भी जो जलता हुआ मिल जायेगा, उस दिये से पुछना, मेरा पता मिल जायेंगा... असा शेर म्हणत त्यांनी पाच वर्षांत सहन केलेल्या वेदनेला वाट मोकळी करून दिली.
गुजरातचे मार्केटिंग थांबवावे
फडणवीस म्हणाले, विरोधकच गुजरातचे मार्केटिंग करीत आहेत. त्यांनी ते थांबवावे. जुलै २०२२ पासून महाराष्ट्रात २२० प्रकल्प आले आहेत. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र 'नंबर वन' आहे. महाराष्ट्रात मुंबई व पुणे हीच औद्योगिकीकरणाची केंद्रे होती. पण, आता छत्रपती संभाजीनगर, नाशिक, गडचिरोलीसारखे दुर्गम भागही विकासाचे केंद्र बनत आहेत. गडचिरोलीत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
खंडणीखोरांपासून दूर राहण्याचा सल्ला
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझ्या पक्षासह सर्वच पक्षांच्या लोकांनी खंडणीखोरांपासून दूर राहावे. असे लोक पुढे चालून आपल्याच गळ्याचा फास बनतात, असा धोकाही वर्तविला.
तीन मुख्यमंत्री अन् तीन शिफ्ट...
महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्रिपदाच्या निवडीला होत असलेल्या दिरंगाईबाबतही सोशल मीडियावर बरेच मीम व्हायरल झाले. त्यातील एका मीममध्ये मित्रपक्षांच्या नेत्यांना प्रत्येकी आठ तास मुख्यमंत्री बनवावे, असे म्हटले होते. त्यामुळे अजित पवार सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत काम करतील, असा निर्णयही आम्ही घेतला होता. कारण ते लवकर उठतात. मी दुपारी चार ते रात्री बारा. आणि नाईट शिफ्ट कोणाला दिली जाणार हे जनतेला माहीत आहे, फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून म्हणताच सभागृहात हशा पिकला.
फडणवीस म्हणाले...
- राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के अपारंपरिक ऊर्जेचा वापर.
- राज्यात २५४ मोबाइल फॉरेन्सिक लॅब उभारणार
- मध्य प्रदेशच्या धर्तीवर प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान वाढविण्याची केंद्राला विनंती.
- आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत रेकॉर्ड एफडीआय.
- नदीजोड प्रकल्प आणि जलसंधारणाच्या कामांना गती दिली जाईल.
- कर्नाटकातून टोयोटाचा प्लॅट महाराष्ट्र आला.