विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन: विरोधकांची उद्यापासून परीक्षा; आज आखणार रणनीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 06:03 IST2024-12-15T06:03:20+5:302024-12-15T06:03:41+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारतर्फे रामगिरीवर आयोजित चहापानावर विरोधक बहिष्कार टाकणार आहेत.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन: विरोधकांची उद्यापासून परीक्षा; आज आखणार रणनीती
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारी नागपुरात सुरुवात होत आहे. मोठ्या संख्याबळासह पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांमध्ये उत्साह आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या साथीने महायुतीचे बळ वाढले आहे. तर दुसरीकडे मोठी पडझड झालेला विरोधी पक्ष विखुरल्याचे चित्र आहे. अधिवेशनात खऱ्या अर्थाने सरकारची नव्हे तर विरोधकांचीच परीक्षा होण्याची चिन्हे आहेत.
रविवारी सकाळी १०:३० वाजता बैठक होणार असून, तीत अधिवेशनाची रणनीती आखली जाणार आहे. काँग्रेसने अद्याप आपला गटनेता निवडलेला नाही. सरकार विरोधी पक्षनेतेपद देण्यास संमती देईल की नाही, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. राजभवनातील हिरवळीवर दुपारी ३ वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यानंतर रामगिरीवर मंत्रिमंडळाची बैठक व चहापान होईल. यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका मांडतील.
चहापानावर बहिष्कार
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारतर्फे रामगिरीवर आयोजित चहापानावर विरोधक बहिष्कार टाकणार आहेत. ईव्हीएमवर बंदी घालण्याची मागणी, शेतकऱ्यांच्या समस्या, उद्योगांचे स्थलांतर आदी मुद्द्यांवर विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. विरोधाची धार आणखी तीव्र करण्यासाठी विरोधक चहापानावर बहिष्कार घालून सरकारला इशारा देतील.