हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 09:16 PM2018-07-17T21:16:00+5:302018-07-17T21:22:02+5:30
राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तो अंमलात आणला मात्र डिसेंबरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसा निर्णय झाला असून तो पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केला जाईल.
अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तो अंमलात आणला मात्र डिसेंबरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसा निर्णय झाला असून तो पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केला जाईल.
मुंबईत आमदारांच्या निवासस्थानाचे पाडकाम सुरु केले जाणार आहे. शिवाय मुंबईतल्या पावसामुळे अधिवेशनाच्या कामकाजावर परिणाम होतो असे सांगून पावसाळी अधिवेशन विदर्भात घेण्याचा निर्णय झाला. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात नागपूरात अभूतपूर्व पाऊस झाला. त्यामुळे एक दिवस अधिवेशन रद्द ही करावे लागले. मात्र आता हिवाळी अधिवेशन नागपूरात न घेता ते मुंबईत घेतले जाणार आहे. नागपूरातल्या हॉटेल चालकांनाही तुम्ही तुमचे वेगळे बुकींग घ्यायचे असेल तर घ्या, असे संदेशही गेल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनात विधिमंडळातल्या अनेक दालनांमध्ये एसी लावण्याची वेळ आली. तर अनेक दालनांमधून मोठे कुलर्स ठेवले गेले, त्याचे पाईप त्याच दालनांच्या बाहेर सोडलेले पहायला मिळाले. काही ठिकाणी तर खिडक्या कापून पाईप बाहेर काढल्याचे चित्र होते.
दरम्यान, मुंबईतील मनोरा आमदार निवास पाडण्याचे काम चालू करण्याचा निर्णय घेतला गेला. आमदारांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना दर महिना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचेही ठरले. त्यानुसार आमदारांना पैसे देणेही सुरु झाले. मात्र काही आमदारांनी मनोºयामधील रुमही अजून सोडल्या नाहीत आणि महिना लाख रुपये घेणेही सोडलेले नाही. ही धक्कादायक बाब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या बैठकीत समोर आल्यानंतर हे अधिवेशन संपले की अशा आमदारांवर कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्याचे समजते.