हिवाळी अधिवेशनावर होणार ५४ कोटी रुपये खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 11:47 PM2020-10-09T23:47:31+5:302020-10-09T23:48:44+5:30
Nagpur winter session, Expenditure विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दोन आठवड्याचा कार्यक्रम निश्चित होताच तयारीलाही जोर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी)ने यासाठी ५४ कोटी रुपये खर्चाचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दोन आठवड्याचा कार्यक्रम निश्चित होताच तयारीलाही जोर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी)ने यासाठी ५४ कोटी रुपये खर्चाचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तयारीचा खर्च केवळ पायाभूत सुविधांचाच आहे. अधिवेशनाचे काकाकाज, वाहतूक, वाहन आदींवरचा खर्च वेगळा असेल.
विशेष म्हणजे मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रविभवनासोबतच आमदार निवासाचा उपयोग सध्या कोरोनाशी लढण्यात येणाऱ्या कामासाठी केला जात आहे. रविभवनात डॉक्टरांचे निवास व टेस्टिंग सेंटर बनवण्यात आले आहे. तर आमदार निवासात कोविड केअर सेंटर आहे. या दोन्ही इमारती अधिवेशनासाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या इमारतीमध्ये तयारीच्या दृष्टीने काम सुरु करण्यासाठी त्या अगोदर ताब्यात घेऊन सॅनिटाईज करून पाच दिवसांसाठी बंद केल्या जातील. यानंतर रंगरंगोटीचे काम केले जाईल. याचप्रकारे हिवाळी अधिवेशनाच्या कामात वापरण्यात येणाºया सुयोग इमारतींच्या खोल्यांमध्ये आलमाऱ्या तयार करण्यात येतील. हैदराबाद हाऊस व विधानभवनालाही नवीन रुप दिले जाईल. लवकरच निविदा काढून २० तारखेपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची योजना आहे.
पीडब्ल्यूडीच्या अंदाजानुसार कस्तुरचंद पार्कमध्ये पार्किंगची व्यवस्था केली जाईल. पोलीस लाईन टाकळीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था होईल. मोर्चे नियंत्रणासाठी बॅरिकेड्सही घेण्यात येतील. बाहेरच्या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी भाड्याने जागा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय पलंग, गाद्या, ब्लँकेट आदी घेण्यात येतील.