'सेवा पंधरवाडा' संपायला चार दिवस शिल्लक अन् शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे
By मंगेश व्यवहारे | Published: September 28, 2022 02:24 PM2022-09-28T14:24:46+5:302022-09-28T14:26:38+5:30
सेवा पंधरवाडा संपतोय, शिक्षण विभागाला आता आली जाग
नागपूर : राज्य सरकारने प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाडा सरकारी कार्यालयात आयोजित करण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात बैठक घेवून जिल्ह्यातील सर्वच विभागांना हा पंधरवाडा आयोजनाचे निर्देश दिले होते. शिक्षण विभागाला त्याची २६ सप्टेंबरला जाग आली.
शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावाने पत्र काढून तत्काळ शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिले. शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित आहे. वर्षानुवर्षे रेंगाळत असलेल्या तक्रारींचा निपटारा होत नाही. सेवा पंधरवाडा आयोजित करण्यासंदर्भात शिक्षक संघटनांना आंदोलन करावे लागले. आता पंधरवाडा संपायला चार दिवस शिल्लक असताना शिबीर आयोजनाचे पत्र पाठवून वरातीमागून घोडे दौडविण्याचे काम शिक्षण विभाग करीत आहे.