नागपूरचा पारा १२.४ वर, गाेंदिया सर्वाधिक गारठला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 09:19 PM2022-12-20T21:19:12+5:302022-12-20T21:19:47+5:30
Nagpur News उत्तर भारताकडून प्रवाहित हाेणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळे कमाल व किमान तापमानात घसरण हाेण्यास सुरुवात झाली आहे. सध्या तरी तापमानात चढर-उतार कायम असला तरी थंडीत वाढ झाली आहे.
नागपूर : डिसेंबरच्या सुरुवातीचे १५ दिवसांतील थंडी मॅन-दाैस चक्रीवादळाच्या प्रभावाने हिरावून घेतली. मात्र आता वादळाचा प्रभाव पूर्णपणे ओसरला असून उत्तर भारताकडून प्रवाहित हाेणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळे कमाल व किमान तापमानात घसरण हाेण्यास सुरुवात झाली आहे. सध्या तरी तापमानात चढर-उतार कायम असला तरी थंडीत वाढ झाली आहे.
मंगळवारी नागपुरात १२.४ अंश किमान तापमानाची नाेंद करण्यात आली. २४ तासात यात एक अंशाची वाढ झाली असली तरी सरासरीपेक्षा ते कमी आहे. विदर्भात गाेंदिया सर्वाधिक गारठला असून येथे १०.५ अंश किमान तापमानाची नाेंद करण्यात आली आहे. त्याखाली यवतमाळ ११.५ अंश व गडचिराेलीत रात्रीचा पारा १२.२ अंशावर गेला. यासह वर्धा १३ अंश व अमरावतीत १३.८ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. इतर शहरात रात्रीचा पारा सरासरीपेक्षा काही अंशी अधिक आहे. दरम्यान, दिवसाच्या कमाल तापमानात माेठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नागपूरला दिवसाचा पारा ३१ अंशांवर गेला, जाे सरासरीपेक्षा २.२ अंश अधिक आहे. अकाेला, अमरावती, बुलढाणा, ब्रह्मपुरीत कमाल तापमान सरासरीपेक्षा २.५ ते ३.८ अंशाने अधिक आहे.
पुढच्या काही दिवसात पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर राजस्थानमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने नाेंदविली आहे. मध्य भारतावरही याचा प्रभाव पडणार असून डिसेंबरच्या उरलेल्या १० दिवसात बाेचरी थंडी अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. पुढचे काही दिवस विदर्भात कमाल व किमान तापमान स्थिरावलेले राहू शकते. ३१ डिसेंबरपर्यंत कडाक्याच्या थंडीची लाट येण्याची शक्यताही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.