शिक्षकांवरील दाखल गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:08 AM2021-07-25T04:08:02+5:302021-07-25T04:08:02+5:30
भिवापूर(नांद)/बेला: महालगाव प्रकरणात मुख्याध्यापक व शिक्षकांचा कुठलाही प्रत्यक्ष सहभाग नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, अशी व्यथा मांडत शिक्षक ...
भिवापूर(नांद)/बेला: महालगाव प्रकरणात मुख्याध्यापक व शिक्षकांचा कुठलाही प्रत्यक्ष सहभाग नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, अशी व्यथा मांडत शिक्षक भारतीने शनिवारी बेला पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज वाघाडे यांना निवेदन दिले. याप्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी सुध्दा निवेदनातून करण्यात आली आहे.
लोकमतने शनिवारच्या अंकात ‘शिक्षक मित्राने दिल्या छड्या अन् २०० उठबशा’ या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. चिमुकलीला करण्यात आलेल्या शिक्षेचा विविध स्तरातून निषेध करण्यात आला. दरम्यान शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी बेला पोलीस स्टेशन गाठत ठाणेदार पंकज वाघाडे यांच्याशी चर्चा केली. शासन परिपत्रकानुसार ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार तसेच विद्यार्थ्यांचे पालक व पंचायत समिती भिवापूर येथील अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार ग्रामपंचायतीने ‘शिक्षक मित्र’ म्हणून स्वयंसेवकांची नियुक्ती केली. ‘शिक्षकमित्र’ असलेली स्वयंसेवक व विद्यार्थिनी मध्ये घडलेल्या प्रकाराबाबत शाळेतील शिक्षकांना कुठलीही माहिती नाही. शिवाय या घटनेशी शिक्षकांचा कुठलाही सबंध नसल्याचे शिक्षक संघटनेने म्हटले आहे. शिष्टमंडळात शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण फाळके, महेद्र बनसिंगे, नरेश पन्नासे, सुधाकर ठाकरे, अभय बुध्दे, पाल्केश्वर खोब्रागडे, विठ्ठल वांगे, अरुण चांदेकर आदींचा सहभाग होता.
लेकुरवाळेनीही घेतली ठाणेदारांची भेट
यासंदर्भात काही शिक्षकांनी माजी जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे यांची भेट घेत महालगाव प्रकरणी शिक्षकांवर गुन्हे दाखल केल्याची कैफियत मांडली. दरम्यान लेकुरवाळे यांनी बेला पोलीस स्टेशन गाठत ठाणेदार पंकज वाघाडे यांची भेट घेतली. प्रकरणाची सखोल चौकशी करूनच कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेने सुध्दा शिक्षकांवर दाखल गुन्ह्यांचा निषेध केला आहे. याप्रकरणी चौकशीची मागणी जिल्हाध्यक्ष शरद भांडारकर, संजय चामट, मनोज घोडके, हरिश्चंद्र दहाघाणे, श्रीराम वाघे आदींनी केली आहे.
240721\img-20210724-wa0125.jpg
बेला येथील ठाणेदार पंकज वाघाडे यांना निवेदन देतांना शिक्षक भारतीचे पदाधिकारी