नेमाडे यांचा ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 11:50 AM2021-01-23T11:50:29+5:302021-01-23T11:51:07+5:30
Gondia News ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीला २०१४ सालचा साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार परत घेण्याची मागणी वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना तालुका अर्जुनी-मोरगाव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत लेखक भालचंद्र नेमाडे यांनी लभाण-बंजारा समाजातील स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह लेखन केले आहे. या कादंबरीला २०१४ सालचा साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार परत घेण्याची मागणी वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना तालुका अर्जुनी-मोरगाव यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन नायब तहसीलदार एम. यू. गेडाम यांना शुक्रवारी (दि. २२) देण्यात आले.
या कादंबरीत हरीपुरा या लभाण समाजाच्या तांड्याचे वर्णन लेखकाने केले आहे. यात स्त्रियांविषयी अत्यंत अश्लील व बीभत्स स्वरूपाचे लेखन करून अखिल भारतीय स्तरावरील सुमारे १२ कोटी समाजबांधवांच्या भावना दुखविण्याचे कार्य लेखकाने हेतुपुरस्सर केले आहे. यामुळे समाजातील सांस्कृतिक मूल्याला ठेच पोहोचली आहे. या लेखनाचा समाजात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. ही कादंबरी त्रिखंडात्मक असल्याचा उल्लेख स्वतः लेखकाने केला आहे. मग अपूर्ण कादंबरीच्या पहिल्याच खंडाला ज्ञानपीठ पुरस्कार कसा देण्यात आला, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करून पुरस्कार निवड समितीला दूषित भावनेतून केलेले लेखन कसे दिसले नाही, असा आरोप संघटनेने केला आहे. लेखक नेमाडे यांना तात्काळ अटक करावी. तसेच त्यांना चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्यासाठी राज्य सरकारने भारत सरकारला तसेच ज्ञानपीठ पुरस्कार समितीला शिफारस करावी. कादंबरीच्या विक्रीवर तत्काळ बंदी आणावी अशी मागणी समाजबांधवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे. कठोरातील कठोर कारवाई न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.