मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात, केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 02:54 PM2021-12-24T14:54:55+5:302021-12-24T15:03:07+5:30
गावपातळीवरील शेतकरी व एकूणच शेती क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने कायदे आणले होते, परंतु काही लोकांना ते पटले नाही, केंद्र सरकारला नाईलाजाने तीन पाऊल मागे यावे लागले, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणले.
नागपूर : शेतकऱयांच्या प्रचंड विरोधामुळे केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात, असे संकेत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज नागपुरात दिले.
रेशीमबाग मैदान येथे आयोजित ऍग्रो व्हिजनचा उद्घाटनाचा कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृहात शुक्रवारी पार पडला. यावेळी प्रमुख आतिथी म्हणून केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर बोलत होते, ते म्हणाले स्वातंत्र्यानंतर कृषी क्षेत्रात खूप काम झाले. परंतु खासगी गुंतवणूक झाली नाही. इतर क्षेत्रात खासगी गुंतवणूक आली. त्याचे फायदेही त्या त्या क्षेत्राला मिळाले. परंतु कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक न झाल्याने तितका फायदा कृषी क्षेत्राला मिळू शकला नाही, असे ते म्हणाले.
जी काही गुंतवणूक झाली ती केवळ सरकारने केली. पायाभूत विकास झाला तो सुद्धा शहर, तालुका स्तरावर झाला. मात्र, गावपातळीवर शेतकऱ्यांच्या त्याचा काहीही लाभ मिळू शकला नाही. गावपातळीवरील शेतकरी व एकूणच शेती क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने कायदे आणले होते, परंतु काही लोकांना ते पटले नाही, केंद्र सरकारला नाईलाजाने तीन पाऊल मागे यावे लागले, परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे येऊ असे म्हणत, भविष्यात मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा परत येऊ शकतात अशे संकेत त्यांनी दिले.