साडेतीन वर्षात राज्यात डेंग्यूचे ३१७ बळी

By admin | Published: September 19, 2016 02:50 AM2016-09-19T02:50:13+5:302016-09-19T02:50:13+5:30

डासांमार्फत पसरणाऱ्या विविध रोगांवर नियंत्रण यावे यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो.

Within three and a half years 317 victims of dengue in the state | साडेतीन वर्षात राज्यात डेंग्यूचे ३१७ बळी

साडेतीन वर्षात राज्यात डेंग्यूचे ३१७ बळी

Next

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाला पूर्ण यश नाहीच : हिवतापाचे दीड लाखांहून अधिक रुग्ण
नागपूर : डासांमार्फत पसरणाऱ्या विविध रोगांवर नियंत्रण यावे यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग, चिकनगुनिया यासारख्या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात या कार्यक्रमाअंतर्गत हवे तसे यश आलेले नाही. गेल्या साडेतीन वर्षात राज्यामध्ये ‘डेंग्यू’मुळे ३१७ नागरिकांना जीव गमवावा लागला. हिवतापाचे तर या कालावधीत दीड लाखाहून अधिक रुग्ण सापडले असून २०८ नागरिकांचा बळी गेला. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही बाब समोर आली आहे.

राज्यात डासांमुळे प्रसारित होणाऱ्या रोगांसंदर्भात उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी आरोग्यविभाग सहसंचालकांकडे (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. २०१३ ते जुलै २०१६ या कालावधीत राज्यात डेंग्यू-हिवताप-हत्तीरोग-चिकनगुनियाचे किती रुग्ण आढळले, किती रुग्णांचा मृत्यू झाला इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते.
यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१३ ते ३१ जुलै २०१६ या कालावधीत या ४ रोगांचे मिळून १ लाख ९९ हजार ६३९ रुग्ण आढळून आले. यापैकी ५२५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.
या रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण २०१२ पर्यंत नियंत्रणात यावे व २०१५ सालापर्यंत हत्तीरोगाचे पूर्णपणे निर्मूलन करणे हे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. २००९ सालाच्या तुलनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी २०१३ नंतर रुग्णांचे प्रमाण परत वाढण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. हत्तीरोगाचे पूर्णपणे निर्मूलन झाले नसून साडेतीन वर्षात ११ हजार ३१९ रुग्ण आढळून आले.(प्रतिनिधी)

हिवताप अजूनही धोकादायकच
केंद्र, राज्य शासनाकडून हिवतापावर नियंत्रण यावे यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हिवतापाच्या रुग्णांचे प्रमाण २००९ च्या तुलनेत कमी झाले असले तरी २०१३ नंतर प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी २०१३ ते जुलै २०१६ या कालावधीत हिवतापाचे १ लाख ६६ हजार २२७ रुग्ण आढळून आले. यात २०८ नागरिकांचा बळी गेला. याच कालावधीत ‘डेंग्यू’चे २१ हजार ८० रुग्ण आढळले व यातील ३१७ जण मरण पावले.
२०१६ मध्ये १६ हजारांहून अधिक रुग्ण
१ जानेवारी ते ३१ जुलै २०१६ या ७ कालावधीत हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या, हत्तीरोग या आजारांचे १६ हजार ५४ रुग्ण आढळून आले. यातील तीन रुग्णांचा जीव गेला. यात डेंग्यूचे १,७७८ व हिवतापाचे १२ हजार ५६३ रुग्ण आहेत.

Web Title: Within three and a half years 317 victims of dengue in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.