तीन दिवसात लुधियानाला पोहोचविले औषध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:13 PM2020-04-20T12:13:15+5:302020-04-20T12:14:09+5:30
लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. जिल्हा आणि राज्यांच्या सीमाही सील आहेत. परंतु अशा कठीण परिस्थितीत कुठलाही पर्याय नसताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लुधियानातील एका गरजू रुग्णाला औषध पोहोचवून कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. जिल्हा आणि राज्यांच्या सीमाही सील आहेत. परंतु अशा कठीण परिस्थितीत कुठलाही पर्याय नसताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लुधियानातील एका गरजू रुग्णाला औषध पोहोचवून कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला आहे.
लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेगाड्या बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पार्सल व मालगाड्या चालविण्यात येत आहेत. अशा कठीण परिस्थितीत लुधियानातील एका रुग्णाला तातडीने औषधांची गरज होती. हा रुग्ण अनिवासी भारतीय आहे. यापूर्वी त्याने औषधे नागपूरहूनच मागविले होते. परंतु लॉकडाऊन असल्याने त्यांची अडचण झाली. नागपुरात राहणारे नातेवाईकही काही करू शकत नव्हते. ही माहिती एका नातेवाईकाने टिष्ट्वटरवरून शेअर केली. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील पार्सल विभागाचे मुख्य पार्सल अधीक्षक शेखर बालेकर यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी लगेच आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी मुख्य पार्सल पर्यवेक्षकाला संबंधित नातेवाईकाची तसेच औषधांची माहिती घेण्याची सूचना केली. अलीकडेच चेन्नई ते दिल्लीदरम्यान पार्सल ट्रेन चालविण्यात आली. या गाडीच्या लोकोपायलटकडे औषधे सोपविण्यात आली तसेच पुढच्या चालकाला औषधाबाबत सूचना देण्यास सांगण्यात आले. याच गाडीतून औषधे अमृतसरपर्यंत पोहोचविण्यात आली. तेथून दुसºया पार्सल ट्रेनमधून ही औषधे लुधियानाला पोहचविण्यात आली. नागपूरहून निघालेली औषधे लुधियानातील रुग्णापर्यंत पोहोचण्यास तीन दिवसाचा वेळ लागला. पण इतक्या लवकर औषधे मिळतील अशी अपेक्षा संबंधित रुग्णालाही नव्हती. औषध मिळाल्याने रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी नागपूर रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहे.