कला अन् सौंदर्य वजा केल्यास जीवन नीरस होईल: प्रमोदबाबू रामटेके
By दयानंद पाईकराव | Published: October 6, 2023 07:33 PM2023-10-06T19:33:54+5:302023-10-06T19:34:39+5:30
अरविंद बाकडे, अनिल वाकोडीकर यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन.
दयानंद पाईकराव, नागपूर : रसिकतेशिवाय कोणत्याची कलेचे मूल्यमापन करता येत नाही. जीवनात कला, सौंदर्याला खूप महत्त्व असून, जीवनातून सौंदर्य अन् कला वजा केल्यास जीवन नीरस होईल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रकार प्रो. डॉ. प्रमोदबाबू रामटेके यांनी केले.
लोकमत भवन येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत अरविंद बाकडे आणि अनिल वाकोडीकर यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर चित्रकार अनिल वाकोडीकर, अरविंद बाकडे, जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे समन्वयक अमित गोनाडे उपस्थित होते. प्रमोदबाबू रामटेके म्हणाले, सौंदर्याची जाण असलेल्या व्यक्तीचे चित्र पाहून जनमानसावर ठसा उमटतो. कलेचे शिक्षण न घेता उत्तम कलाकृती साकारल्याबद्दल त्यांनी दोन्ही कलावंतांचे कौतुक करून दोघांचेही चित्र वास्तववादी असल्याचा उल्लेख केला.
अरविंद बाकडे यांनी चित्रांसाठी ब्लॅक ॲण्ड व्हाइट संकल्पना निवडल्याचे सांगून चित्रांची आवड असल्यामुळे कोरोनाकाळातील वेळेचा सदुपयोग केल्याची माहिती दिली. पुढे रंगसंगतीचा वापर करून चित्र साकारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. अमित गोनाडे यांनी नागपुरातील कलावंतांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रदर्शनात दोन्ही कलावंतांची प्रत्येकी ६० अशी एकूण १२० चित्रे ठेवण्यात आली आहेत. हे प्रदर्शन ८ ऑक्टोबरपर्यंत रसिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. सूत्रसंचालन आनंद मांजरखेडे यांनी केले. आभार चित्रकार अनिल वाकोडीकर यांनी मानले.