समाज परिवर्तनाशिवाय देशात परिवर्तन अशक्य
By admin | Published: October 3, 2015 02:56 AM2015-10-03T02:56:33+5:302015-10-03T02:56:33+5:30
समाज हा पाया आहे. कोणतेही परिवर्तन घडवून आणायचे असल्यास सर्वप्रथम ते समाजात घडवावे लागते.
सुधाकर कोहळे : भोयर-पवार समाजाचा वार्षिक मेळावा, ज्येष्ठ नागरिक - गुणवंतांचा सत्कार
नागपूर : समाज हा पाया आहे. कोणतेही परिवर्तन घडवून आणायचे असल्यास सर्वप्रथम ते समाजात घडवावे लागते. समाज परिवर्तनाशिवाय देशात परिवर्तन होणे अशक्य आहे, असे मत आ. सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय भोयर-पवार महासंघातर्फे शुक्रवारी आयोजित ज्येष्ठ नागरिक, गुणवंतांचा सत्कार आणि समाज मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बालाघाट (म.प्र.) येथील जवाहलाल नेहरू कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रदीप बिसेन होते. माजी आयुक्त प्रदीप काळभोर, महासंघाचे माजी अध्यक्ष धनराज देशमुख, सिडकोचे सहयोगी नियोजनकार ज्ञानेश्वर भादे, वर्धा जिल्हा परिषदेच्या बालकल्याण सभापती चेतना मानमोडे, मॅकडियान ट्रेनिंगचे संचालक मनोज चव्हाण, सेवानिवृत्त सहायक निबंधक श्रीराम देशमुख, महासंघाचे अध्यक्ष डॉ. नामदेव राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाज एकसंघ, एकजूट राहिल्यास समाजाची ताकद स्पष्टपणे दिसून येते. त्यासाठी समाज मेळावा, ज्येष्ठांचा सत्कार आणि तत्सम कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. समाज हा संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम करतो.
रुढी, परंपरांनी समाज एकजूट होतो. वृद्धांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. या कार्यक्रमानेही तो उद्देश साध्य केला आहे. त्यामुळे संस्कृतीची खोलवर मुळे या समाजात रुजली आहेत, हे स्पष्टपणे जाणवते. व्यक्ती मोठा करण्यात समाजाचा मोठा हातभार असतो. मात्र समाजाने आपल्याला काय दिले असे म्हणून व्यक्ती समाजाच्या बाहेर राहू इच्छिते. मात्र त्यापेक्षा आपण समाजासाठी काय केले हा प्रश्न आपण स्वत:लाच विचारला पाहिजे, असे मतही आ. कोहळे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणातून प्रदीप बिसेन यांनी जिल्हा, राज्य, देश या कोणत्याच समाजासाठी सीमा राहू शकत नाही. त्यामुळे पृथ्वीतलावर असलेल्या समाजातील घटकाने आपण एकाच समाजाचे घटक आहोत हे समजून समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी महासंघाचे माजी अध्यक्ष धनराज देशमुख यांनी समाजाने वेळोवेळी एकजुटता दाखविणे आवश्यक असल्याचे मत मांडले. प्रास्ताविक नामदेव राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आ. डॉ. आशिष देशमुख यांनी धावती भेट दिली. संचालन मंजू देवासे यांनी तर आभार महासंघाचे सचिव मोरेश्वर भादे यांनी मानले.
आयोजनासाठी मधुकर चोपडे, श्रावण गं. फरकाडे, नामदेव पराडकर, शंकर पाठेकर, मोरेश भादे, डॉ. विजय पराडकर, प्रभाकर देशमुख, मारोतराव कडवे, कपूरचंद पराडकर, मारोतराव चोपडे, सुभाष पाठे, डॉ. हरिभजन धारपुरे, विठ्ठल देवासे, रमेश धंडाळे, प्राचार्य वसंत खवसे, अजय खवसे, संजय फरकाडे, नंदू ढोबळे, रामेश्वर चोपडे, अरुण धारपुरे यांच्यासह युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)