विना ‘हेल्मेट’ होईल मृत्यूचा ‘चेकमेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 07:55 PM2020-08-12T19:55:12+5:302020-08-12T20:01:19+5:30
‘कोरोना’पासून बचाव व्हावा यासाठी उपराजधानीतील बहुतांश नागरिक व विशेषत: दुचाकीस्वारांकडून ‘मास्क’ घालण्यात येत असल्याचे चित्र आहे. मात्र ‘कोरोना’शी बचाव करत असताना अपघातापासूनदेखील बचाव करणे तितकेच महत्त्वाचे आहे याचा बहुदा अनेकांना विसर पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’पासून बचाव व्हावा यासाठी उपराजधानीतील बहुतांश नागरिक व विशेषत: दुचाकीस्वारांकडून ‘मास्क’ घालण्यात येत असल्याचे चित्र आहे. मात्र ‘कोरोना’शी बचाव करत असताना अपघातापासूनदेखील बचाव करणे तितकेच महत्त्वाचे आहे याचा बहुदा अनेकांना विसर पडला आहे. ‘लोकमत’ने शहरातील विविध चौकांमध्ये केलेल्या ‘रिअॅलिटी चेक’मध्ये ‘हेल्मेट’प्रति दुचाकीस्वारांची उदासीनता दिसून आली आहे. अनेक दुचाकीस्वार विना ‘हेल्मेट’च वाहन चालवत असून यासंदर्भात त्यांना जबाबदारीचे भान नसल्याचे चित्र आहे.
नागपुरात ‘हेल्मेट’ सक्ती अनेक दिवसांपासून आहेच. शिवाय ‘कोरोना’ काळात शहरात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात ५ ऑगस्टपासून विविध वाहनात प्रवासी नेण्यासाठी सूट देण्यात आली आहे. दुचाकी चालकासोबत १ जण प्रवास करू शकण्यास मुभा देण्यात आली असून हेल्मेट व मास्क घालणे अनिवार्य आहे. या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते.
‘लोकमत’च्या चमूने शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये पाहणी केली असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे. कधी ‘ट्रिपल सीट’ कधी विना ‘हेल्मेट’ वाºयाच्या वेगाशी स्पर्धा करताना मृत्यूलाच आमंत्रण देण्याचा प्रकार सर्रास पहायला मिळाला. काही चौकांमध्ये तर वाहतूक पोलीस ‘मास्क’ नसलेल्यांवर कारवाई करत होते. मात्र ‘हेल्मेट’ न घातलेल्यांना साधी विचारणादेखील होत नव्हती.
प्रतापनगर, शंकरनगर चौक
प्रतापनगर, शंकरनगर चौकात ‘लोकमत’च्या चमूने पाहणी केली असता अनेक जण विना ‘हेल्मेट’चेच दिसून आले. या चौकात सतत वाहतूक पोलीस तैनात असतात. मात्र कुणावरही कारवाई होत नव्हती.
पोलीस दादा, तुम्हीसुद्धा!
कायद्याचे पालन करणे व त्यातून जनतेसमोर आदर्श घालून देणे ही पोलिसांची जबाबदारीच आहे. मात्र शहरातील काही ठिकाणी पोलिसच विना ‘हेल्मेट’ दुचाकी चालविताना ‘लोकमत’च्या चमूला दिसून आले. नियम तोडणाºया सामान्य जनतेवरच कारवाई होत नसताना ‘हेल्मेट’ न घालणाºया पोलिसांना कोण विचारणा करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बाजारपेठ, गर्दीच्या ठिकाणी ‘हेल्मेट’ नाहीच
इतवारी, महाल, गांधीबाग इत्यादी बाजारपेठांच्या भागांमध्ये तर अनेक दुचाकीचालक ना ‘मास्क’, ना ‘हेल्मेट’ असे दिसून आले. या भागात वाहतूक पोलीस असून नसल्यासारखेच असतात. ‘कोरोना’ काळातदेखील बाजारपेठांमध्ये गर्दी वाढते आहे. अशा ठिकाणी जास्त खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र नागरिकांमध्ये यासंदर्भात उदासीनता दिसून आली.
और क्या क्या पहने...
लॉ कॉलेज चौकात सहा तरुण तीन वेगवेगळ्या दुचाक्यांवर चालले होते. त्यांच्याकडे तोंडावर अर्धवट लावलेले ‘मास्क’ होते, मात्र ‘हेल्मेट’ नव्हते. त्यांना विचारणा केली असता अगोदरच ‘मास्क’ लावून कंटाळा आला आहे. आणखी काय काय घालायचे असे उत्तर त्यांनी दिले.
‘हेल्मेट’ चक्क गाडीला
कार्यालय सुरू होण्याच्या वेळेत ‘लोकमत’ चमूने दक्षिण नागपुरातील काही चौकात पाहणी केली असता अजबच प्रकार पहायला मिळाला. चेहº यावर ‘मास्क’ तर दिसून येत होते. शिवाय सोबत ‘हेल्मेट’देखील होते. मात्र ‘हेल्मेट’ डोक्यावर घालायच्या ऐवजी ते गाडीला लटकवले होते.
अचानक का थंडावली ‘हेल्मेट’ कारवाई ?
‘कोरोना’ काळाच्या अगोदर ‘हेल्मेट’संदर्भात जागोजागी कारवाई व्हायची. मात्र ‘कोरोना’चा संसर्ग सुरू झाल्यानंतर या कारवाईला ब्रेकच लागला. जानेवारी २०१९ ते जून २०२० या कालावधीत हेल्मेट न घालता दुचाकी चालविण्याप्रकरणी १ लाख ७४ हजार ९१२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून २ कोटी ४१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत कारवाई थंडावल्याचेच चित्र होते. अद्यापही तीच स्थिती आहे.
‘हेल्मेट’ न घालणे मृत्यूलाच निमंत्रण देण्यासारखे
जानेवारी ते जुलै या काळात ३०३ अपघात झाले. त्यात ९१ प्राणांतिक अपघात झाले असून ४४ दुचाकीस्वारांचा समावेश होता. यातील बहुतांश चालकांनी हेल्मेट घातले नसल्याचे किंवा हेल्मेटचा दर्जा योग्य नसल्याचे समोर आले आहे. मार्च ते मे या तीन महिन्यात १३ दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू झाले.