राज्यनिर्मितीशिवाय विदर्भाचे भले नाही : श्रीहरी अणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 08:43 PM2019-09-24T20:43:13+5:302019-09-24T20:45:26+5:30
विदर्भ राज्याची निर्मिती झाल्याशिवाय विदर्भाचे भले होणार नाही. त्यासाठी रक्तरंजित क्रांती न करता राजकीय मार्गानेच हा लढा लढून वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी लागेल, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. श्रीहरी अणे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ राज्याची निर्मिती झाल्याशिवाय विदर्भाचे भले होणार नाही. त्यासाठी रक्तरंजित क्रांती न करता राजकीय मार्गानेच हा लढा लढून वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी लागेल, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. श्रीहरी अणे यांनी केले.
विदर्भ राज्य आघाडीचा चौथा वर्धापन दिन आंध्र असोसिएशन सभागृहात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अॅड. श्रीहरी अणे होते. कार्याध्यक्ष अॅड. नीरज खांदेवाले, पूर्व विदर्भ विभाग प्रमुख अनिल जवादे, सचिव अमोल कठाणे, महासचिव संजय नेरकर, अमोल बोरखडे, सुरेश पारधी, वैभव लोणकर, श्रीकांत थुलकर, इर्ले गुरुजी, मेघा उताणे आदी उपस्थित होते.
अॅड. अणे म्हणाले, सत्ताप्राप्तीसाठीच या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. कारण सामाजिक बदलासाठी आणि विदर्भाची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी हाच मार्ग आहे. निव्वळ आंदोलनाने बदल होणार नाही. आंदोलनाचे परिवर्तन पक्षात करा. पक्ष केवळ निवडणुकीपुरता नसून वर्षभर आंदोलनाच्या रूपाने काम करीत राहील. मैदानात अनेक जुने पक्ष आहेत. त्यामुळे चार वर्षापूर्वी स्थापन झालेला पक्ष जिंकणार की नाही याचा विचार करू नका. आंदोलनासाठी आपल्याला लढावेच लागेल, असे आवाहन त्यांनी केले. रक्तरंजित आंदोलन, जाळपोळ यातून विदर्भनिर्मिती नको. ज्याच्या घरचा तरूण मुलगा जातो, त्यांनाच त्याचे दु:ख ठाऊक असते. निवडणुकीच्या माध्यमातून आपला लढा व्यापक करा.
नीरज खांदेवाले म्हणाले, २०१४ मध्ये विदर्भ राज्यनिर्मितीचे नाव घेऊन सत्तेत आलेले आज आश्वासन विसरले आहेत. विदर्भाचा विरोध करणाऱ्या शिवसेनेलाही त्यांनी सोबत घेतले आहे, यावरून त्यांच्या मनात विदर्भनिर्मितीबद्दल किती कळवळा आहे, हे समजून घ्यावे. अमेरिकेतील हाऊडी मोदी कार्यक्रमावरही त्यांनी टीका केली.
अनिल जवादे, प्रा.जोगेंद्र गवई, कविता उईके, रामकिशन सिंगनजुडे आदींची यावेळी भाषणे झाली. अॅड.अनिल गोवारदीपे, अॅड.आसिफ कुरेशी, अॅड.शैलेश नारनवरे, अॅड.आशुतोष पोतनीस, अॅड.अतुल पांडे, अॅड.अविनाश काळे यांच्यासह जागृत पालक समितीचा यावेळी सत्कार करण्यात आला. विदर्भभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.
विदर्भनिर्मितीसह ११ ठराव
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा यासह एकूण ११ ठराव यावेळी पारित करण्यात आले. विधानसभा निवडणुका इव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरून व्हाव्या, विदर्भातील बंद कारखाने सुरू करून बेरोजगारी दूर करावी, गडचिरोली जिल्ह्यातील ११० प्रतिबंधात्मक कलम रद्द करावे आदींचा यात समावेश आहे.